When Rajesh Khanna attacked Vinod Khanna: दिवगंत अभिनेते राजेश खन्ना यांच्या अभिनयाबद्दल आजही बोलले जाते. ६० व ७० च्या दशकात रोमँटिक भूमिका साकारणारा अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. कित्येकदा बॉलीवूडचा पहिला सुपरस्टार, असेही त्यांना संबोधले जाते.
अभियाबरोबरच त्यांनी ९० च्या दशकात यशस्वी राजकारणी म्हणूनदेखील स्वत:ची ओळख निर्माण केली होती. त्यांनी १९८४ ते २०१२ पर्यंत म्हणजेच त्यांच्या मृत्यूपर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेससाठी प्रचार केला.
राजेश खन्ना विनोद खन्नांबद्दल काय म्हणालेले?
२०१२ मध्ये त्यांनी पीटीआय(PTI)ला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी अभिनेते विनोद खन्ना आणि क्रिकेटर नवजोत सिंग सिद्धू यांच्यावर टीका केली होती. ते म्हणालेले, “विनोद खन्ना यांनी गुरुदासपूरमधील मतदारांना अनेक आश्वासने दिली होती. चित्रपट अकादमी स्थापन करतील असेही त्यांनी म्हटले होते. परंतु त्यांनी कधीही त्यांचा शब्द पाळला नाही. त्यामुळेच मतदारांनी त्यांना हाकलून लावले.”
ते असेही म्हणालेले, “इतर राजकारण्यांप्रमाणे मी माझ्या स्वतःच्या लोकांना खोटी आश्वासने देऊन कधीच सोडून देणार नाही. जेव्हा तुम्ही जनतेची सेवा करू शकत नाही तेव्हा त्यांना खोटी आश्वासने देऊ नका, असे माझे मत आहे. कारण- हे पाप आहे.”
याच मुलाखतीत, राजेश खन्नांनी नवज्योत सिंग यांच्याबाबतही वक्तव्य केले होते. ते म्हणालेले की, नवज्योत सिंग चांगला विनोदी कलाकार आहे आहे; पण तो चांगला राजकारणी होऊ शकत नाही. राजकारण म्हणजे विनोद नाही, असेही ते म्हणाले होते. नवज्योत सिंग २००४ आणि २००९ मध्ये भाजपाच्या तिकिटावर अमृतसरमधून लोकसभा निवडणूक जिंकली होती. तसेच २००५ मध्ये त्यांनी कॉमेडी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजचे जज म्हणून काम करण्यास सुरू केले होते.
विनोद खन्ना १९९७ मध्ये भारतीय जनता पार्टीकडून गुरुदासपूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. १९९९ आणि २००४ मध्ये त्यांनी निवडणूक जिंकली. २००९ मध्ये गुरुदासपूरमधून निवडणूक हरले; मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले. २०१७ मध्ये त्यांचे कर्करोगाने निधन झाले. राजेश खन्ना यांनी १९९२-९६ पर्यंत काँग्रेसमधून नवी दिल्ली मतदारसंघातून खासदार म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारण सोडले.
दरम्यान, राजेश खन्ना यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात. त्यांच्या स्वभावाबद्दल आजही त्यांचे सहकलाकार वक्तव्य करतात. राजेश खन्नांची जितकी लोकप्रियता होती, त्याची बरोबरी कोणीही करू शकणार नाही. पण, त्याच राजेश खन्नांना पडता काळ पाहावा लागला. त्यांची लोकप्रियता लयास गेली. त्यांचा चाहतावर्ग कमी झाला. त्यांचे चित्रपट अपयशी ठरू लागले. ते अनेक कलाकारांसाठी रागीटपणे बोलल्याचे म्हटले जाते.