शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाची गेले अनेक महिने सर्वत्र प्रचंड चर्चा आहे. अखेर ७ सप्टेंबर रोजी हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ७० कोटींची छप्परफाड कमाई केली आहे. संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरातही या चित्रपटाची चांगलीच हवा आहे.

चित्रपटक्षेत्रातीलही बऱ्याच लोकांनी शाहरुखच्या ‘जवान’चं कौतुक केलं आहे. कंगना रणौतपासून एसएस राजामौलीपर्यंत कित्येकांनी ‘जवान’चं आणि शाहरुख खानच्या स्टारडमचं कौतुक केलं आहे. यापाठोपाठ आता ‘काबिल’, ‘कांटे’,सारखे चित्रपट देणारे दिग्दर्शक संजय गुप्ता यांनीही ‘जवान’चं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा : ‘जवान’ मधील ‘या’ अभिनेत्रीने केलेलं ‘नो किसिंग पॉलिसी’वर भाष्य; म्हणाली “माझा नवरा…”

आपल्या ट्वीटमधून संजय यांनी शाहरुख खानचं कौतुक केलं आहेच. याबरोबरच ९० च्या दशकातील एक आठवणही त्यांनी शेअर केली आहे. संजय गुप्ता आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, “९० च्या दशकात जेव्हा अन्डरवर्ल्डचं चित्रपटव्यवसायावर वर्चस्व होतं आणि जेव्हा ते फिल्म स्टार्सना आपल्या तालावर नाचवायचे तेव्हा शाहरुख खान हा असा एकमेव स्टार होता ज्याने त्यांना भीक घातली नाही. तो म्हणायचा मला गोळी घालायची असेल तर घाला, पण मी तुमच्यासाठी काम करणार नाही. मी पठाण आहे. शाहरुख खान आजही अगदी तसाच आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

९० च्या दशकात अन्डरवर्ल्डचा चित्रपटव्यवसायावर प्रचंड दबाव असायचा. त्या काळात अबू सालेम अन् शाहरुख खान यांच्यातही बऱ्याचदा खटके उडाल्याचं सिनेपत्रकार अनुपमा चोप्रा यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केलं आहे. त्यावेळी शाहरुखची लोकप्रियता पाहता त्याला कुणी इजा पोहचवू शकलं नाही, अन् आजही तो तितकाच लोकप्रिय आहे, किंबहुना त्याच्या लोकप्रियतेत झालेली भर आपण ‘जवान’ला मिळणाऱ्या प्रतिसादावरुन बघू शकतो.