Zayed Khan on Esha Deol and Aishwarya Rai: झायेद खान व ईशा देओल अनेक चित्रपटांत एकत्र झळकले होते. यामध्ये ‘चुरा लिया है तुमने’, ‘दस’, ‘कॅश’ अशा अनेक चित्रपटात हे कलाकार एकत्र झळकले होते. त्यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केल्याने ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत झायेद खानने यावर वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, या सगळ्या चर्चा खोट्या होत्या. आता जी माझी पत्नी आहे, तिच्याशी मी दीर्घ काळ रिलेशनशिपमध्ये होतो. ईशा देओल माझी खूप चांगली मैत्रीण आहे.

“मी ईशा देओलबरोबर कधीच…”

झायेद खानने नुकतीच सिद्धार्थ कननच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. झायेद म्हणाला, “मी ईशा देओलबरोबर कधीच रिलेशनशिपमध्ये नव्हतो. आम्ही खूप चित्रपट एकत्र केले आहेत. माझी पत्नी मलायका त्यावेळी माझी गर्लफ्रेंड होती आणि मलायका आणि ईशा कायमच चांगल्या मैत्रिणी आहेत. ईशा खूप गोड मुलगी आहे. ती आयुष्यभर माझी चांगली मैत्रीण राहील.”

याच मुलाखतीत झायेद खानने ऐश्वर्या रायबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता, यावर देखील वक्तव्य केले. त्यांनी ‘शब्द’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. अभिनेता म्हणाला, “शब्द हा असा चित्रपट होता, ज्यामध्ये एक विवाहित महिला एका तरुण मुलाच्या प्रेमात पडते. मी निवडलेले सर्व चित्रपट काळाच्या पुढे होते. ‘शब्द’ची कथा चांगली होती. हा चित्रपट अशा काळात प्रदर्शित झाला, त्यावेळी अशा आशयाचे चित्रपट पाहण्याची लोकांची मानसिकता तयार झालेली नव्हती.”

पुढे अभिनेता म्हणाला, “ऐश्वर्या जेव्हा मिस वर्ल्ड झाली तेव्हा मी तिचा चाहता होतो. माझ्या लॉकर रूममध्ये तिचा फोटो असायचा. जेव्हा मी चित्रपटाची पटकथा ऐकली आणि मला कळले की ऐश्वर्या चित्रपटात आहे, तेव्हा मी लगेच निर्मात्यांना विचारले की करारावर मी कुठे सही करायची आहे, इतका मी तिचा चाहता होता. तिच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव खूप छान होता.”

झायेद म्हणाला, “एखाद्याबरोबर कसे वागायचे आहे हे ऐश्वर्याला चांगलेच माहीत आहे. मी ऐश्वर्याचा चाहता होतो, त्यामुळे तिच्याबरोबर कसे, काय बोलणार, असा मला प्रश्न पडला होता. मात्र, तिने अगदी सहज माझ्याशी बोलायला सुरुवात केली. तिने मला विचारले की सीन करण्यासाठी रिहर्सल करायची आहे का? ऐश्वर्या खूप सुंदर आहे. आज लोक फोटो काढताना फिल्टर्स लावतात, पण तिच्याकडे नैसर्गिक फिल्टर आहे.”

दरम्यान, झायेदच्या कामाबद्दल बोलायचे तर इतक्या चित्रपटांत काम करूनही त्याला पडता काळ पाहावा लागला. २००९ मधील ‘ब्लू’ चित्रपटाच्या अपयशानंतर अभिनेता चित्रपटात फारसा दिसला नाही. त्यानंतर २०१५ मध्ये ‘शराफत गई तेल लेने’ या चित्रपटात तो मोठ्या पडद्यावर दिसला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.