गायक झुबीन गर्ग यांचे सप्टेंबर महिन्यात सिंगापूरमध्ये निधन झाले. झुबीन यांच्या मृत्यूप्रकरणी १४ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर, झुबीन गर्गच्या दोन बँड सदस्य शेखर ज्योती गोस्वामी आणि अमृतप्रवा महंता यांना शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.

कामरूप येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. दोघांना आधी न्यायालयात आणण्यात आलं आणि नंतर वेगवेगळ्या पोलीस व्हॅनमधून नेण्यात आले. त्यांना १४ दिवसांनी पुन्हा न्यायालयात हजर केलं जाईल.

झुबीन गर्ग यांच्या मृत्यूप्रकरणातील इतर पाच आरोपींना बुधवारी न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर बक्सा जिल्हा कारागृहाबाहेर हिंसाचार झाला. त्त्यामुळे या दोघांना कोणत्या तुरुंगात ठेवलं जाईल याबद्दल अधिकाऱ्यांनी कोणतीच माहिती दिलेली नाही.

विशेष तपास पथकाने (एसआयटी) बऱ्याच दिवसांच्या चौकशीनंतर गोस्वामी व महंता दोघांनाही ३ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. त्यानंतर त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणात १ ऑक्टोबरपासून एसआयटीने एकूण सात जणांना अटक केली आणि सर्वांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय.

झुबीन गर्ग यांचा १९ सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये समुद्रात पोहताना मृत्यू झाला. यानंतर नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे (एनईआयएफ) मुख्य आयोजक श्यामकानू महंता, झुबीन यांचे मॅनेजर सिद्धार्थ शर्मा, झुबीनचे चुलत भाऊ आणि पोलीस अधिकारी संदीपन गर्ग आणि त्यांचे पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर नंदेश्वर बोरा आणि प्रबीण वैश्य यांना बुधवारी कामरूपच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीत पाठवलं. या सर्वांच्या सुरक्षेबद्दल काळजी व्यक्त करत त्यांना कमी कैदी असलेल्या कोठडीत ठेवण्यात यावं, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.

दरम्यान, आसाम सरकारने सिंगापूरमध्ये झुबीन गर्ग यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी १० सदस्यांची एसआयटी स्थापन केली होती. आतापर्यंत राज्यभरातून महंता, शर्मा व इतरांविरोधात ६० हून जास्त एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. यानंतर मुख्यमंत्र्यांनी डीजीपींना या सर्व तक्रारी सीआयडीकडे सोपवण्याचे व सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.