कोकण म्हटलं की इथलं नितांत रमणीय निसर्गसौंदर्य आणि पिढय़ान् पिढय़ा पाचवीला पुजलेलं दारिद्रय़, या दोन गोष्टी अनेकांच्या मनात ठळकपणे येतात. मराठी साहित्य आणि नाटय़-चित्रपटांमधूनही प्रामुख्याने याचंच चित्रण वर्षोनुर्वष केलं गेलं, पण काळाच्या ओघात हे बदललं आहे. म्हणजे असं की, एकीकडे निसर्गावर मानवाकडून होत असलेल्या आघातांमुळे इथलं सौंदर्य लोप पावतं आहे, तर दुसरीकडे शिक्षण आणि विविध प्रकारची कौशल्यं आत्मसात करून पुढल्या पिढय़ांपैकी अनेकांनी दारिद्रय़ रेषा ओलांडण्यात यश मिळवलं आहे. या प्रक्रियेत स्वाभाविकपणे काही नवीन प्रश्नही निर्माण झाले आहेत. सध्या चर्चेत असलेल्या ‘दशावतार’ आणि ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या दोन चित्रपटांनी या नव्या प्रश्नांचा आपापल्या परीने वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
दशावतार ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पारंपरिक लोककला. याचबरोबर, कोकणातली जंगलं किंवा देवरायाच नव्हे, तर शेती किंवा घर-परडय़ाचासुद्धा कोणीतरी राखणदार असतो, अशी इथली पूर्वापार समजूत. इथला देवभोळा माणूस दरवर्षी त्याला ‘राखण’ (कोंबडय़ाचा बळी/नारळ) देऊन परिसराच्या रक्षणाचं गाऱ्हाणं घालतो. चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी खाणींमुळे कोकणातल्या निसर्गाचा होणारा विध्वंस आणि त्या विरोधातला जनक्षोभ मांडण्यासाठी या लोककलेचा आणि राखणदार या समजुतीचा एकत्रितपणे वापर करून ‘दशावतार’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
झी स्टुडिओजचं पाठबळ लाभलेल्या या चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीमध्ये कोणतीही कसूर ठेवण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच ‘दशावतार’चा भरपूर बोलबाला झाला. दिलीप प्रभावळकर यांच्यासारखा प्रतिभावान, बुजुर्ग कलावंत, दशावतार या लोककलेची झलक दाखवणारी अप्रतिम रंगतदार दृश्यं आणि कोकणच्या समृद्ध जैवविविधतेच्या पाश्र्वभूमीवर केलेलं उच्च तांत्रिक दर्जाचं चित्रीकरण-संकलन या चित्रपटाच्या काही जमेच्या बाजू. राजकीय हेतूने निर्माण करण्यात आलेलं ‘विकास विरुद्ध निसर्ग’ हे कृत्रिम द्वंद्व लोकप्रिय लोककलेच्या माध्यमातून मांडण्याचा हा प्रयत्न ‘दशावतार’च्या पूर्वार्धात अपेक्षित परिणाम काही प्रमाणात साधतो. उत्तरार्धात, मात्र तर्क आणि वास्तववादाला खुंटीवर टांगून रहस्यमय घटनांच्या साखळीमध्ये प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याचा हा धंदेवाईक दक्षिणी प्रयोग खूपच पातळ होऊन जातो. इथला बाबुली मेस्त्री म्हणजे रजनीकांतच्या स्टंटपटांचा मराठी अवतार वाटतो. चित्रपटाच्या शेवटच्या भागात तर ग्रामस्थांनी हातात पेटते पलिते घेऊन राजकीय नेत्याभोवती नवरात्रातल्या भोंडल्यासारखं फिरणं आणि माधवची होऊ घातलेली पत्नी वंदना हिने सभेत भाषण केल्यासारखं बोलत जाब व
कोकणातल्या निसर्गावर घाला घालणाऱ्या खाणीसारख्या प्रकल्पाच्या विरोधात चित्रपटाच्या माध्यमातून उघड भूमिका मांडल्याचं श्रेय चित्रपटकर्त्यांना नक्कीच द्यावं लागेल, पण या प्रश्नावर कलात्मक स्वातंत्र्याच्या नावाखाली सोपं उत्तर काढण्याचा प्रयत्न अजिबात पटत नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, अशा प्रकारे खाणीला ग्रामस्थांनी केलेला संघटित विरोध सरकारी दमन यंत्रणा कशा प्रकारे मोडून काढते, हे कोकणी लोकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातच कळणे आणि अन्यत्रही वेळोवेळी अनुभवलं आहे. त्यामागे स्थानिक गुंतागुंतीची आर्थिक-सामाजिक-राजकीय कारणं-समीकरणं असतात. कोकणी माणसासाठी तो स्वत:च्या अस्तित्व रक्षणाचा प्रश्न असतो. प्रकल्प रद्द झाला तर होणारं निसर्गरक्षण हा त्याचा आनुषंगिक परिणाम (२्रीिीऋऋीू३) असतो. ही वास्तविकता इथं पूर्णपणे नजरेआड केलेली आहे. त्याचबरोबर, सूड म्हणून का होईना, खाण चालवण्यासाठी मदत करणाऱ्या स्थानिकांचे खून, तेही अतींद्रिय शक्तीकडून, प्रत्यक्षात शक्य नसतात. अशा कलाकृतीचा आस्वाद घेताना तत्त्व प्रेक्षकांनी अंगीकारणं अपेक्षित असतं, हे मान्य आहे.
चित्रपटाची पोस्टर्स किंवा ट्रेलर पाहून गर्दी करणाऱ्या पारंपरिक दशावतारप्रेमी कोकणी माणसांचीही हा चित्रपट पूर्ण निराशा करतो. कारण त्यांना दशावतार या लोककलेची चित्रपटाच्या माध्यमातून मांडणी अपेक्षित होती. इथं निर्माता-दिग्दर्शकांचा तो हेतू नव्हता, पण नाव आणि पोस्टर-ट्रेलरमुळे सामान्य प्रेक्षकांची फसगत होते. शिवाय, राखणदार या अंधश्रद्धेचा चित्रपटात केलेला वापर इतका पराकोटीचा आहे की बाबुलीच्या मागावर आलेल्या पोलिसांना जंगलचा राखणदार बिबटय़ाच्या रूपात येऊन ‘जगी ज्यास कोणी नाही..’ या काव्यपंक्तीची आठवण करून देत पळवून लावतो.
‘दशावतार’पाठोपाठ ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ हा कोकणच्या सामाजिक-आर्थिक पाश्र्वभूमीवरचा आणखी एक चित्रपट झळकला. मुंबईत संसार थाटण्याच्या कोकणातल्या एका तरुणीच्या स्वप्नामुळे तिच्या नवऱ्याची होणारी कमालीची घालमेल, ओढाताण, त्यातून निर्माण होणारे ताणतणाव या चित्रपटात अतिशय परिणामकारक पद्धतीने दाखवले आहेत. यासंदर्भात महत्त्वाची बाब म्हणजे, ही केवळ एका तरुणाची वैयक्तिक कथा नसून गेल्या सुमारे पंधरा-वीस वर्षांत कोकणासह महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अनुभवाला येत असलेलं हे प्रातिनिधिक वास्तव आहे.
कोकणात रोजगाराच्या संधी कमी असल्यामुळे इथला माणूस मुंबईची वाट धरतो, हे पिढय़ानुपिढय़ांचं वास्तव आहे. इथल्या अर्धकुशल किंवा अकुशल माणसालासुद्धा मुंबईच्या गिरण्या हा एकेकाळी रोजगारासाठी मोठा आधार होता. त्या गेल्यानंतरही अन्य विविध व्यापार-उद्योगांमध्ये ही महानगरी कोकणी माणसाला सामावून घेत राहिली. त्यामुळे उत्पन्नाचं फारसं काही साधन नसेल तर घरातला हुशार किंवा कर्ता पुरुष मुंबईला नोकरीसाठी जात असे, मात्र त्याच्या घरातली ज्येष्ठ मंडळी, पत्नी, मुलं हे सारं कुटुंब गावाकडे राहून गुजराण करत असे, असं चित्र साधारणपणे गेल्या शतकाच्या अखेपर्यंत होतं. त्यानंतरच्या तरुण पिढीमध्ये हे चित्र बदललं. एखाद्या मुलीकडून लग्नाला होकार देताना, मुंबईत केवळ नोकरी करणारा नव्हे, तर तिथेच भाडय़ाची खोली घेऊन का होईना, आपल्या पत्नी, मुला-बाळांसह संसार थाटू शकणारा नवरा हवा, अशी मागणी पुढे येऊ लागली. हल्ली अनेकदा मुलीच्या बाजूने ही अनिवार्य अटच असते. कारण गावाकडच्या गैरसोयी सोसून शेती, मोलमजुरी करण्याची तिची तयारी नसते. त्या तुलनेत मुंबईतल्या आधुनिक साधनसुविधांची ओढ असते.
त्यामुळे अगदी चाळ किंवा झोपडपट्टीतली बेकायदा भाडय़ाची खोली मिळाली तरी चालेल, पण गावातल्या आर्थिक सुस्थिती असलेल्या मुलालासुद्धा नकार असतो. अशा परिस्थितीत लग्न होण्यासाठी, इच्छा किंवा ऐपत असो किंवा नसो, मुलांना मुंबईत नोकरी मिळवून स्थायिक होण्यासाठी नाना खटपटी कराव्या लागतात. ते केलं नाही तर लग्न जमणं खूप अवघड होऊन बसतं, हा वेगळाच गंभीर सामाजिक प्रश्न अलीकडे निर्माण झाला आहे. अशा वेळी प्रसंगी खोटं सांगून लग्न करायचं आणि एक-दोन वर्षांनी लग्नानंतर जन्मलेल्या लहान मूल व पत्नीसह गावी येऊन राहायचं, अशीही क्लृप्ती लढवली जाते. हे विविध प्रकारचे सार्वत्रिक अनुभव ‘कुर्ला टू वेंगुर्ला’मधून दिग्दर्शक विजय कलमकर यांनी काही वेळा विनोदी, तर काही वेळा गंभीर प्रसंगांची उत्तम गुंफण करत अतिशय वास्तववादी पद्धतीने मांडले आहेत. त्याचबरोबर, चित्रपटात काम केलेले वैभव मांगले, सुनील तावडे किंवा वीणा जामकर वगळता बहुसंख्य कलाकार स्थानिक किंवा चित्रपटाचे पटकथा-संवाद लेखक अमरजीत आमले यांच्या कार्यशाळांमधून पुढे आलेले आहेत. या दोन्हीमुळे प्रेक्षकांना आपल्या कुटुंबातले किंवा आसपासच्या घरातले प्रसंग चित्रपटाच्या माध्यमातून मांडल्यासारखे वाट
कोकणातल्या एका मंगल कार्यालयामध्ये आयोजित कार्यशाळेच्या वेळी त्या कार्यालयाच्या मालकांनी, सुखवस्तू कुटुंब असूनही आपल्या मुलाचं लग्न जमत नसल्याची व्यथा आमले यांच्याशी अनौपचारिक गप्पांमध्ये मांडली. त्यातून त्यांना या चित्रपटाचं सूत्र सापडलं. खरं तर चित्रपटाच्या वेंगुर्ला परिसरातल्या कथानकाचं चित्रीकरण सुमारे सात वर्षांपूर्वीच पूर्ण झालं होतं, पण त्यानंतर करोनामुळे सगळं काम ठप्प झालं. करोनाचा जोर ओसरल्यानंतर उर्वरित काम पूर्ण करून हा चित्रपट पडद्यावर साकारला आहे.
‘दशावतार’ आणि ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या दोन चित्रपटांचा सम्यक विचार केला तर असं स्पष्टपणे जाणवतं की, कोकणातल्या निसर्ग-पर्यावरणाचा ऱ्हास, या ज्वलंत विषयाला भिडण्याचा आव आणणारा ‘दशावतार’ अतिशय अवास्तव, अतिरंजित पद्धतीने सोपं उत्तर काढून मोकळा झाला आहे, तर ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ने समाजातला सध्याचा कळीचा प्रश्न छोटय़ा छोटय़ा कौटुंबिक प्रसंगांच्या साखळीतून सहज सोप्या पद्धतीने फुलवत मांडला आहे आणि त्याचं उत्तर सुजाण संवेदनशील प्रेक्षकांवर सोपवलं आहे. त्यामुळेच दशावतारी देखाव्यापेक्षा कुल्र्याचं वास्तव मनाला जास्त भिडतं.
pemsatish. kamat@gmail.com