बॉलिवूडची डिंपल गर्ल दीपिका पदुकोण लवकरच संजय लीला भन्साली यांच्या ‘पद्मावती’ या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात दीपिका राणी पद्मावती यांची भूमिका साकारताना दिसत आहे. आता दीपिकाने ‘पद्मावती’ सिनेमाच्या संहितेचा फोटो तिच्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर टाकला आहे. या फोटोमध्ये सिनेमाच्या संहितेचे मुखपृष्ठ दिसत आहे. या मुखपृष्ठावर पद्मावती असे लिहिले आहे. हा फोटो सोशल मीडियावर टाकताना तिने लिहिले आहे की, रामलीलाची तीन वर्षे.
एका ऐतिहासिक कथानकावर भाष्य करणाऱ्या या सिनेमामध्ये अल्लाउद्दीन खिलजी, राणी पद्मावती, मेवाडचे राणा रतन सिंग यांच्या व्यक्तिरेखा साकारण्यात येणार आहेत. ‘पद्मावती’ सिनेमामध्ये १३ ते १४ व्या शतकातील चित्रण साकारण्यात येणार आहे. त्यामुळे त्या काळची मेवाडची समृद्ध संस्कृती पाहता त्यावर जास्त लक्ष केंद्रित येत आहे. ‘पद्मावती’ या सिनेमाच्या रुपाने पुन्हा एका रंजक ऐतिहासिक काळाचा आणि कथानकाचा उलगडा होणार आहे. रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, शाहिद कपीर यांच्या या सिनेमामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमातील भूमिकेसाठी शाहिदने त्याच्या लूक्सवर फार मेहेनत घेतल्याचे कळत आहे.
दरम्यान, भन्साली यांच्यासोबत दीपिकाचा हा तिसरा सिनेमा आहे. याआधी दीपिकाने भन्साली यांच्यासोबत रामलीला आणि बाजीराव मस्तानी या सिनेमात काम केले होते. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरले होते.
दीपिकाच्या व्यावसायिक सिनेमांवर नजर टाकली तर, तिचा पहिला हॉलिवूडपट ट्रिपल एक्सः रिटर्न ऑफ झेंडर केज लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत हॉलिवूड स्टार विन डिजेलही दिसणार आहे.