राजनाथ सिंह यांचे गौरवोद्गार; पद्मविभूषण पुरस्कार प्रदान

आपल्या आगळ्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चे वेगळेपण सिद्ध करीत रसिकांच्या मनावर अनेक दशके राज्य करणारे बुजुर्ग अभिनेते दिलीपकुमार यांना आज त्यांच्या निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. चित्रपटसृष्टीच्या भरभराटीसाठी दिलीपकुमार यांनी दिलेले योगदान दीपस्तंभासारखे व अविस्मरणीय आहे, अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
यंदाचा पद्मविभूषण पुरस्कार स्वीकारण्यासाठी वृद्धत्वामुळे समारंभास उपस्थित राहू न शकलेल्या दिलीपकुमार यांना त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी हा पुरस्कार राजनाथ सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार, दिलीपकुमार यांच्या पत्नी सायरा बानू, तसेच दिलीपकुमार यांचे कुटुंबीय व निवडक चाहते याप्रसंगी उपस्थित होते.
दिलीपकुमार यांच्यासारख्या महान कलाकारास माझ्या हस्ते पुरस्कार देण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो, असे उद्गार याप्रसंगी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. दिलीपकुमार यांनी चित्रपटसृष्टीला आपल्या कसदार अभिनयातून एक दिशा दिली. आपल्या अभिनयातून त्यांनी चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे, असे प्रशंसोद्गार फडणवीस यांनी काढले.

बुजुर्ग अभिनेते दिलीपकुमार यांना रविवारी मुंबईत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते तसेच राज्यपाल विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पद्मविभूषण पुस्काराने सन्मानित करण्यात आले.