देशभरात प्रत्येक जण दिवाळीची तयारी करण्यात व्यग्र आहे. लोक फटाक्यांपासून ते दिवे, सजावटीच्या वस्तू आणि नवीन कपडे अशा सर्व गोष्टी खरेदी करीत आहेत; पण दिलजीत दोसांझ दिवाळी साजरी करत नाही.
प्रत्येक जण दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना, दिलजीतने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो दिवाळीबद्दलच्या त्याच्या भावना व्यक्त करतो आणि तो ती का साजरी करीत नाही हे स्पष्ट करतो.
हा व्हिडीओ दिलजीत दोसांझच्या ‘टीम दिलजीत ग्लोबल’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. दिलजीतने स्पष्ट केले की, त्याला दिवाळी खूप आवडते आणि त्याला फटाके वाजवण्याची खूप आवड होती; पण आता त्याला भीती वाटते. तो आणि त्याचे कुटुंब एक महिना आधीच दिवाळीची तयारी सुरू करायचे.
दिलजीत दोसांझ काय म्हणाला?
व्हिडीओमध्ये दिलजीत दोसांझ म्हणाला, “मी खूप फटाके फोडायचो. दिवाळी हा माझा आवडता सण होता. पण नंतर, जेव्हा मी माझ्या कुटुंबापासून वेगळे झालो तेव्हा मी दिवाळी साजरी करणे बंद केले. मी दुःखी झालो. मी पुन्हा कधीही दिवाळी साजरी केली नाही. अन्यथा, दिवाळी हा माझा आवडता सण आहे. मला फटाके फोडणे खूप आवडते.”
दिलजीत दोसांझने स्पष्ट केले की, दिवाळीची तयारी महिनाभर आधीच सुरू व्हायची. त्याचे घर आणि आजूबाजूचे गाव रोषणाईने सजवले जायचे. ते संध्याकाळी फटाके फोडायचे आणि नंतर त्याच्या गावातील दोसांझ कला येथील गुरुद्वारा, शिव मंदिर, दर्गा आणि गुगा पीर मंदिरात जाऊन दिवे लावायचे.
दिलजीत दोसांझ म्हणाला की, हे उत्सव रात्री उशिरापर्यंत चालू असायचे. जर त्याच्याकडचे फटाके संपले, तर तो इतरांकडून उधार घेऊन ते फोडायचा. पण जेव्हा तो त्याच्या कुटुंबापासून वेगळा झाला तेव्हा दिवाळीचा आनंद आणि चमक नाहीशी झाली. दिलजीत म्हणाला की, आता त्याला फटाक्यांच्या आवाजाचीही भीती वाटते.
२०२४ च्या एका मुलाखतीत, दिलजीत दोसांझने त्याच्या पालकांशी असलेल्या त्याच्या तुटलेल्या नात्याबद्दल सांगितले होते. त्याने स्पष्ट केले होते की, लहानपणी त्याच्या पालकांनी त्याला चांगले जेवण आणि शिक्षण मिळावे म्हणून एका नातेवाइकाकडे राहण्यासाठी लुधियानाला पाठवले होते. दिलजीतच्या मते, त्याच्या पालकांनी त्याला याबद्दल विचारलेही नाही आणि त्यामुळेच त्यांचे नाते तुटले.