scorecardresearch

विश्लेषण : ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे चित्रपटांचं नुकसान? मल्याळम चित्रपटसृष्टीत नेमकं घडतंय काय, जाणून घ्या

सध्या मल्याळम चित्रपटसृष्टी यामध्ये सर्वात जास्त होरपळून निघाली आहे. कोविडमुळे केरळमध्ये चित्रपटगृहांचे मालक आणि फिल्ममेकर्स यांच्यात बराच तणाव निर्माण झाला आहे. मल्याळम चित्रपट प्रदर्शक चित्रपटांच्या थेट ओटीटी प्रदर्शनाला विरोध दर्शवत आहेत.

विश्लेषण : ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे चित्रपटांचं नुकसान? मल्याळम चित्रपटसृष्टीत नेमकं घडतंय काय, जाणून घ्या
मल्याळम चित्रपट वितरक आणि ओटीटी प्लॅटफॉर्म | malyam films and ott platforms

कोरोना महामारीचा सर्वात मोठा फटका कुणाला बसला असेल तर तो चित्रपटसृष्टीला. कोविडनंतर प्रेक्षकांच्या मानसिकतेत प्रचंड फरक पडला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंट जास्तीत जास्त बघायची सवय प्रेक्षकांना लागली. आजही बहुतांश चित्रपटगृहात जाऊन कमीत कमी हजार रुपये खर्च करून चित्रपट बघण्यापेक्षा प्रेक्षक तो ओटीटीवर येण्याची वाट बघत आहेत. सध्या मल्याळम चित्रपटसृष्टी यामध्ये सर्वात जास्त होरपळून निघाली आहे. कोविडमुळे केरळमध्ये चित्रपटगृहांचे मालक आणि फिल्ममेकर्स यांच्यात बराच तणाव निर्माण झाला आहे. मल्याळम चित्रपट प्रदर्शक चित्रपटांच्या थेट ओटीटी प्रदर्शनाला विरोध दर्शवत आहेत. ‘Exhibitors United Organization of Kerala (FEUOK)’ या संस्थेने ‘केरळ फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स’ला ओटीटी प्रदर्शनासंदर्भात काही सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कोणताही चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो ५६ दिवसांनंतरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाईल अशी सूचना दिली गेली आहे. FEUOK च्या या सुचनेचे पालन ओणमच्या शुभदिवसापासून केले जाईल असेही केरळ फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने स्पष्ट केले आहे.

कोरोना काळात सुप्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरीचा ‘सुफियम सुजाथायुम’ हा चित्रपट जुलै २०२० मध्ये प्रथम ओटीटीवर प्रदर्शित होणारा पहिल्या मल्याळम चित्रपट ठरला. त्यानंतर २०२१ मध्ये सुपरस्टार मोहनलाल यांचा ‘मरक्कर’ हा चित्रपटही ओटीटीवर प्रदर्शित होण्याच्या तयारीत असताना चित्रपट प्रदर्शकांनी याला विरोध दर्शवला होता. एवढा मोठा बिग बजेट चित्रपट हा चित्रपटगृहातच प्रदर्शित व्हायला हवा ज्यामुळे प्रेक्षक सिनेगृहाकडे वळतील अशी बाजू त्यांनी मांडली. निर्माते आणि प्रदर्शक यांच्यात यावरून थोडे वाद झाले पण अखेरीस हा चित्रपट थेट चित्रपटगृहातच प्रदर्शित झाला.

अभिनेता दुलकिर सलमान, त्याची प्रोडक्शन कंपनी आणि Exhibitors Association यांच्यातही मध्यंतरी खटके उडाले होते. दुलकिरचा ‘ग्रिटींग्स’ हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित झाल्याने चित्रपट प्रदर्शक बरेच नाराज होते. तसंच सुप्रसिद्ध अभिनेता फहाद फाजीलच्या बाबतीतसुद्धा असा प्रकार घडला होता.

आणखीन वाचा : विश्लेषण : रिक्षाचालक ते स्टँडअप कॉमेडियन, राजू श्रीवास्तवचा प्रवास जाणून घ्या

चित्रपट प्रदर्शकांचं म्हणणं नेमकं आहे तरी काय?

मल्याळम चित्रपट प्रदर्शकांनी त्याच्या त्यांनी अशी भूमिका घेण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. ओटीटीच्या विळख्यातून केवळ चित्रपटउद्योगच नव्हे तर मल्याळम चित्रपटसृष्टीचं भवितव्याला वाचवायचं हाच चित्रपट प्रदर्शक आणि वितरकांचा उद्देश आहे. FEUOK या संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार म्हणतात की, “ओटीटीवर प्रदर्शित होणार म्हणून बऱ्याच चित्रपटांची गुणवत्ता खालावली आहे. यामुळेच प्रेक्षक हा चित्रपटगृहापासून लांब गेला आहे. एखादा चित्रपट त्यांच्याकडून पाहायचा राहिला तरी काही दिवसांत तो डिजिटल प्लॅटफॉर्मवर येणार याची त्यांना खात्री आहे.” त्यांच्यामते गेल्या काही महिन्यात केवळ १० मल्याळम चित्रपटांनीच तिकीटबारीवर उत्तम कामगिरी केली आहे. यामध्ये मामुट्टि यांचा ‘भीष्मपर्वम’, पृथ्वीराजचा ‘जन गण मन’ आणि ‘हृदयम’सारखे चित्रपट आहेत. मल्याळम चित्रपटसृष्टीने कायमच वेगवेगळ्या विषयांवरचे आशयघन आणि मनोरंजक असे चित्रपट दिले आहेत. ‘जलीकट्टू’,’दृश्यम’, ‘नयट्टू’, ‘द ग्रेट इंडियन किचन’, ‘कोल्ड केस’, अशा वेगवेगळ्या चित्रपटांनी गेली काही महीने ओटीटीवर राज्य केलं आहे. थिरूअनंतपुरममधल्या ‘श्री पद्मनाभम’ चित्रपटगृहाचे मालक गिरीश चंद्रन म्हणतात की “प्रेक्षक चित्रपटगृहापासून दूर गेल्याचा फटका छोट्या चित्रपटांना बसतो आहे. यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मच कारणीभूत आहेत.” नुकतंच बॉलिवूड अभिनेता आमिर खाननेदेखील ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शित होण्याआधी एक वक्तव्य केलं आहे. आमिर म्हणतो की त्याचा चित्रपट किमान ६ महीनेतरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार नाही.

केरळ चित्रपट निर्माते संघटना आणि इतर संस्थादेखील ओटीटी प्लॅटफॉर्म आणि चित्रपटगृहांचे मालक यांच्यातला हा तणाव, गैरसमज दूर करायचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी दोन्हीकडून सर्वतोपरि प्रयत्न होत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीमध्येसुद्धा हा वाद बघायला मिळतो. मध्यंतरी अक्षय कुमार आणि अजय देवगणसारख्या मोठ्या अभिनेत्यांनी त्यांचे चित्रपट थेट ओटीटीला विकल्याने बराच गदारोळ झाला होता. सध्या हिंदी चित्रपटसृष्टीसुद्धा याच टप्प्यातून जात आहे. मोठ्या स्टार्सचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरत आहेत आणि त्यामागेही केवळ एकच कारण आहे ते म्हणजे डिजिटल कंटेंट बघणाऱ्या प्रेक्षकांमध्ये होणारी लक्षणीय वाढ. प्रेक्षक सध्या ‘पुष्पा’, ‘KGF’, ‘RRR’ किंवा नुकताच आलेला ‘विक्रम’सारखे चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर गर्दी करत आहेत. हीच गोष्ट सध्या हिंदी आणि प्रामुख्याने मल्याळम चित्रपटसृष्टीत दिसत नसल्यानेच हा तणाव वाढला आहे. भविष्यात हा तणाव कमी होऊन केरळमधला प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहाकडे वळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

आणखीन वाचा : विश्लेषण : दादाभाई नौरोजीच्या लंडनमधील घराला ‘ब्लू प्लाक’ सन्मान; जाणून घ्या या सन्मानाचं ऐतिहासिक महत्त्व काय

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained the war between malyalam film exhibitors and ott platforms avn