‘कौन बनेगा करोडपती’ हा छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय शोपैकी एक आहे. या शोमुळे प्रेक्षकांचे फक्त मनोरंजन होत नसून त्यांच्या ज्ञानातही भर पडत आहे. सामान्य माणसांप्रमाणेच यात मोठे सेलीब्रेटी सुद्धा सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’ च्या येणाऱ्या भागात लोकप्रिय दिग्दर्शक फराह खान आणि अभिनेत्री दीपिका पादूकोण यांनी हजेरी लावली आहे.

सोनी वहिनीच्या अधिकृत अकाउंटवर नुकताच या विशेष भागाचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोत दीपिका आणि फराह खान हॉट सीटवर विराजमान आहेत आणि तेव्हा त्यांची उत्सुकता चेहऱ्यावर दिसून येत आहे. बिग बी दोघांना खेळाचे नियम समजावत शोचा हुटर वाजेपर्यंत हा खेळ सुरू राहील असं सांगताना दिसले. पुढे जेव्हा हा हुटर वाजतो तेव्हा दीपिका आणि फराह अमिताभ बच्चन यांना विनंती करत वेळ वाढवून द्या असे म्हणताना दिसल्या. या प्रोमो मध्ये त्या  बिग बी यांना वेळोवेळी अनेक आमिष दाखवत असल्याचे बघायला मिळत आहे. दीपिका म्हणते की, “सर आपण पुढे एका चित्रपटात काम करत आहोत” तर फराह त्यांना पुढील चित्रपटात काम देण्याचे प्रॉमिस देखील करताना दिसली आहे.

फराह खानला जार, अन्या आणि दिवा ही तीन मुले आहेत. बिग बी आणि शो च्या टीमला विनंती करुन काहीच उपयोग झाला नाही तेव्हा शेवटी फराह खान म्हणाली, ” सर आता अजून काय करु, माझ्या तीन मुलांपैकी एक मुलगा घ्या पण आम्हाला वेळ द्या”. फराहचे हे उत्तर ऐकून दीपिका आणि बिग बी थक्क झाले आणि हसायला लागले. ‘कौन बनेगा करोडपती’ चा हा मजेदार आणि विशेष भाग तुम्हाला १० डिसेंबरला रात्री ९ वाजता सोनी वाहिनीवर पाहायला मिळेल