अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांनी केलेल्या ट्विटमुळे आगामी ‘एफयू – फ्रेंडशिप अनलिमिटेड’ या मराठी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता बरीच वाढली आहे. चित्रपटाचे मुख्य आकर्षण म्हणजे आकाश ठोसरचा हा ‘सैराट’नंतर दुसरा चित्रपट असून, त्याचा लूकदेखील अतिशय यूथफूल आणि ट्रेंडी असा आहे.
संगीतप्रधान चित्रपट असलेल्या महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘एफयू’चा पहिला ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. आयुष्यात अविस्मरणीय असे अनेक क्षण येतात पण त्यातही हृदयाच्या जवळ असतात त्या कॉलेजच्या आठवणी. तेव्हा केलेली मजा मस्ती कोणीच विसरू शकत नाही. मग क्लासरुममधला धिंगाणा असो की रोमान्स. स्पर्धेपासून राड्यापर्यंतच्या आठवणी यात असतात. पण या सगळ्याच्या वर असते ती मैत्री.
उत्साही, रोमॅण्टिक आणि प्रसंगी बंडखोर असलेल्या तरुणांची कथा म्हणजे एफयू. कॉलेज आयुष्यात प्रत्येकाने घेतलेला अनुभव या सिनेमातून मांडण्यात आला आहे. मग त्यात कॉलेजच्या मॅडमवर होणारे प्रेम असो किंवा ग्रुपमधल्या मुलीवर प्रेम करणारा मुलगा. त्या मुलीला इम्प्रेस करण्यासाठी लव्हगुरूची घेतलेली मदत, या सर्व गोष्टी प्रत्येकानेच त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी केलेल्या असतात. या सर्व गोष्टींचा उजाळा हा ट्रेलर पाहताना नक्कीच होतो.
आकाशसोबतच चित्रपटात संस्कृती बालगुडे, वैदेही परशुरामी, सत्या मांजरेकर, मयुरेश पेम, शुभम किरोडीयन, माधव देवचक्के या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तरुणाईला भुरळ पाडतील अशी रॉकिंग गाणी असणारा हा चित्रपट २ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
एफयूमध्ये एकूण १४ गाणी असून, सोनू निगम, श्रेया घोषाल, अवधूत गुप्ते, प्राजक्ता शुक्रे, बेनी दयाल, सुखविंदर सिंग , नीती मोहन, जोनिता गांधी अशा अनेक गायकांनी गाणी गायली आहेत. या चित्रपटाच्या संगीताचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात सलमानची तथाकथित प्रेयसी लुलिया वंतूर हिने देखील एक गाणे गायले आहे.