Akshay Kumar pays emotional tribute to Asrani : ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी आता या जगात नाहीत. सोमवारी (२० ऑक्टोबर) त्यांचे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

काही दिवसांपासून ते आजारी होते. या दुःखद बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. गोवर्धन असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमारसह अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अक्षय कुमारने शेअर केली पोस्ट

अक्षय कुमारने असरानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्याने लिहिले, “असरानीजींच्या निधनानं मला खूप दुःख झालं आहे. आठवडाभरापूर्वीच ‘हैवान’ चित्रपटाच्या सेटवर आम्ही एकमेकांना मिठी मारली होती. ते खूप गोड माणूस होते. त्यांच्याकडे खास कॉमिक टायमिंग होते. माझ्या ‘हेरा फेरी’, ‘भागम भाग’, ‘दे दना दन’, ‘वेलकम’ आणि आगामी ‘भूत बंगला’ व ‘हैवान’ या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो. आमच्या इंडस्ट्रीचे हे मोठे नुकसान आहे. ओम शांती.”

अक्षय कुमार आणि असरानी ‘वेलकम’, ‘हेरा फेरी’, ‘भूल भुलैया’, ‘दे दना दन’, ‘खट्टा मीठा’, ‘भागम भाग’, ‘आवरा पागल दीवाना’, ‘दिवाने हुए पागल’, ‘इंटरनॅशनल खिलाडी’ यांसह असंख्य चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत.

असरानी त्यांच्या कामाबद्दल खूप सीरियस होते. वयाच्या ८४ व्या वर्षीही ते सतत काम करीत राहिले. त्यांनी अनेक कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयाव्यतिरिक्त त्यांनी दिग्दर्शनातही हात आजमावला आहे. त्यांनी गुजराती चित्रपट ‘अमदवाद नो रिक्षावारो’ दिग्दर्शित केला आहे. त्यांनी ‘चला मुरारी हिरो बनने’, ‘सलाम मेमसाब’, ‘हम नहीं सुधरेंगे’, ‘दिल ही तो है’ व ‘उडान’ यांसारखे चित्रपटही दिग्दर्शित केले आहेत.

असरानी यांची शेवटची पोस्ट

असरानी हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय होते. इन्स्टाग्रामवर त्यांचे जवळपास साडेसहा लाख फॉलोअर्स होते. सुरुवातीच्या काळात साकारलेल्या भूमिकांचे काही व्हिडीओ ते आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर शेअर करायचे. निधन होण्याच्या काही तास अगोदरच असरानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेवली होती. सध्या दीपावलीचा उत्सव सुरू आहे. या उत्सवानिमित्त त्यांनी त्यांच्या सर्व चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर काही वेळातच त्यांचे निधन झाले आहे.