Gulshan Grover Wanted to Beat Anil Kapoor For His Lying : बॉलीवूडचा बॅड मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलशन ग्रोव्हरची कारकीर्द नकारात्मक भूमिकांनी भरलेली आहे. त्याने केसरिया विलायतीसारख्या संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का गुलशन ग्रोव्हरला चित्रपटांमध्ये काम कसे मिळू लागले? अभिनेता अनिल कपूर यांनी त्याच्या कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावली. अनिल कपूर यांच्या एका गोष्टीमुळे गुलशनला त्याच्या कारकिर्दीत एक मोठा चित्रपट मिळाला. हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीत एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
रोशन तनेजाच्या अॅक्टिंग स्कूलमध्ये शिकत असताना दोघेही जवळचे मित्र बनले होते. तोपर्यंत अनिल कपूर यांनी काही चित्रपटांमध्ये काम केले होते; तर गुलशन ग्रोव्हर संघर्ष करीत होता. एके दिवशी अनिल कपूर यांनी गुलशनला विचारले, “तू कन्नड चित्रपटात काम करशील का?” गुलशनने लगेच उत्तर दिले, “मी पथनाट्यंही करेन. भाऊ, चित्रपट ही तर मोठी गोष्ट आहे.” अनिल यांनी मग त्याला सांगितले की, तो मणिरत्नम यांच्या कन्नड चित्रपट, ‘पल्लवी अनु पल्लवी’मध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे आणि गुलशनलाही एक भूमिका मिळणार आहे. चित्रीकरण उटीमध्ये होणार होते.
दोघे उटीला पोहोचले; पण तेथे पोहोचताच अनिल गुलशनला धक्का बसेल असे काही बोलले. अनिल म्हणाले, “हे बघ, या चित्रपटात तुझी भूमिका नाही. मी तुला फक्त रिहर्सल आणि सरावासाठी इथे आणले आहे. मी माझ्या खिशातून सर्व खर्च केला आहे.” हे ऐकून गुलशन संतापला. त्याला वाटले की, अनिल विनोद करीत आहेत. त्याला अनिल यांच्यावर हातही उचलावासा वाटला; पण मैत्रीमुळे त्याने स्वतःला थांबवले.
काही दिवस गेले आणि अनिल त्यांच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र झाले. त्यांनी गुलशन ग्रोव्हरची सर्वांसमोर प्रशंसा करायला सुरुवात केली. अनिल यांनी गुलशनची ओळख मणिरत्नम यांच्याशी आणि नंतर चित्रपटाचे छायाचित्रण दिग्दर्शक बाळू महेंद्र यांच्याशीही करून दिली. योगायोगाने, त्यावेळी बाळू महेंद्र श्रीदेवी आणि कमल हासन यांचा चित्रपट ‘सदमा’ बनवण्याची तयारी करीत होते. एके दिवशी बाळू महेंद्र हे अनिल व गुलशनला त्याच्या हॉटेलच्या खोलीत भेटायला गेले आणि बाळू महेंद्र यांनी गुलशनला ‘सदमा’मध्ये खलनायकाची भूमिका ऑफर केली. गुलशनच्या व्यक्तिमत्त्वाने बाळू महेंद्र इतके प्रभावित झाले की, त्यांनी पूर्वी साइन केलेल्या अभिनेत्याला वगळून गुलशनला कास्ट केले. अशा प्रकारे अनिल कपूर यांच्यामुळे गुलशनला इतका मोठा चित्रपट मिळाला. गुलशन स्वतः म्हणतो, “त्या दिवशी मला जाणवले की, अनिल कपूर केवळ एक चांगला अभिनेताच नाही, तर तो एक देव माणूस आहे.”