गेले काही दिवस अभिनेता-निर्माता सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान हे दोघे वेगळे राहत असल्याची चर्चा होती. सोहेलचे अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्यासह प्रेमसंबंध असल्याचेही म्हटले जात होते. पण आता सोहेल आणि सीमा या दोघांमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे कळते. विशेष म्हणजे या दोघांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी दुसरं तिसर कोणी नाही तर खुद्द सलमान खानने पुढाकार घेतल्याचे कळते.
स्पॉटबॉय डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, बॉलीवूडच्या दबंग सलमानने त्याच्या भावाला आणि वहिनीला पुन्हा एकदा एकत्र आणण्यासाठी मध्यस्थाची भूमिका पार पाडली. आपल्या मुलांसह सीमा कफ परेड येथील निवासस्थानी राहत होती. मात्र, आता सलमानच्या मध्यस्थीनंतर ती सोहेलच्या घरी परतली आहे. आधी मलायकाने तिच्या घटस्फोटाच्या बातमीवर मौन सोडले आणि आता सीमाची घरवापसी झाली. त्यामुळे आता हळूहळू खान कुटुंबात सर्वकाही पूर्ववत होत असल्याचे चित्र आहे.



