चित्रपट दिग्दर्शक करण जोहरचा चटपटीत संवादांनी भरलेला ‘कॉफी विथ करण’ हा प्रसिध्द टॉक शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचे हे सहावं पर्व असून, नुकतीच प्रसिध्दीझोतात आलेली इशान खट्टर आणि जान्हवी कपूर ही जोडी या पर्वात पाहायला मिळणार असल्याचे समजते. त्यामुळे इशान -जान्हवी नक्की काय चर्चा करतील याकडे साऱ्याचं लक्ष लागलं आहे. 'सूत्रांच्या माहिती'नुसार, करणच्या 'कॉफी विथ करण' एक पर्सनल चॅट शो असून त्यात कलाकारांना अनेक वेळा अडचणीत आणणारे प्रश्न विचारण्यात येतात. आतापर्यंत या शोमध्ये अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली असून आता 'धडक'फेम इशान-जान्हवीची जोडी येणार आहे. 'धडक' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली असून हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत तयार करण्यात आला आहे. जान्हवी आणि इशानबद्दल त्यांच्या चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता असल्यामुळे आगामी सहाव्या पर्वासाठी या दोघांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, अभिनेत्री सनी लिओनीदेखील या शोमध्ये येण्याची शक्यता असून यापूर्वी दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, आलिया भट यासारख्या कलाकारांनीही कॉफी विथ करणच्या सेटवर हजेरी लावली होती.