‘झिम्मा’ची बॉक्स ऑफिसवर जादू, दोन आठवड्यात कमावले इतके कोटी रुपये

या चित्रपटात तगडी स्टार कास्ट पाहायला मिळते.

लॉकडाउननंतर चित्रपटगृहे सुरु झाली आणि अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाची रांग लागली. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित झाले. या स्पर्धेत मराठी चित्रपट ‘झिम्मा’ही प्रदर्शित झाला आणि दोन आठवडे या चित्रपटाचे शोज ‘हाऊसफुल्ल’ गेले. ‘झिम्मा’चे पहिल्या आठवड्यात ३२५ शोज लागले, त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात ७०० पेक्षा जास्त म्हणजेच दुपटीहून अधिक शोज लागले होते. विशेष म्हणजे ५० टक्के सीट्सची परवानगी असतानाही पहिल्या दोन आठवड्यांमध्ये ‘झिम्मा’ने ५.८३ करोडचा टप्पा पार केला.

लॉकडाउननंतर सुपरहिट ठरलेला ‘झिम्मा’ हा पहिला मराठी चित्रपट आहे. चित्रपटाचे छायाचित्रण, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय या सगळ्याच गोष्टी उत्तम जमून आल्याने प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दिली. सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘झिम्मा’ चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाचे छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह हे या चित्रपटाचे निर्माता आहेत.
आणखी वाचा : कतरिनाने दिले नाही सलमानच्या कुटुंबीयांना लग्नाचे आमंत्रण? अर्पिताने केला खुलासा

‘झिम्मा’च्या या यशाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ” सर्वप्रथम ‘झिम्मा’ सुपरहिट ठरवल्याबद्दल मी सर्व मराठी प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो. प्रेक्षक, मित्र मंडळी, मराठीतील दिग्गज सोशल मीडियाद्वारे, फोनवरून, मेसेजकरून ‘झिम्मा’बद्दल भरभरून बोलत आहेत. मराठी प्रेक्षक नेहमीच मराठी चित्रपटांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. कोरोनाबद्दलची आपली भीती बाजूला सारून चित्रपटगृहांमध्ये येऊन तो सिनेमा पाहात आहे. ‘झिम्मा’चे यश हे माझे एकट्याचे नसून अनेक मजबूत खांदे कशाचीही पर्वा न करता खंबीरपणे उभे होते, म्हणूनच हा ‘झिम्मा’चा खेळ मांडता आला. ”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jhimma movie box office collection avb

ताज्या बातम्या