Kantara Chapter 1 Box Office Collection : अनेक दिवसांपासून सिनेविश्वात एका सिनेमाची जोरदार चर्चा रंगली होती आणि तो सिनेमा म्हणजे ‘कांतारा : अ लिजेंड – चॅप्टर १’. ऋषभ शेट्टीच्या या सिनेमाची चाहते मंडळी आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर २ ऑक्टोबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. रिलीज होताच प्रेक्षकांनी या सिनेमाला अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं.

रिलीज झाल्याच्या अवघ्या १५ दिवसांतच ‘कांतारा – चॅप्टर १’नं ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे या चित्रपटानं अनेक जुन्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. ‘कांतारा चॅप्टर १’ हा २०२२ मध्ये आलेल्या ‘कांतारा’ चित्रपटाचा सीक्वेल आहे. ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार, ‘कांतारा – चॅप्टर १’नं भारतात एकूण ५०६.२५ कोटींची नेट कमाई केली आहे.

रिलीज झाल्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतरही ‘कांतारा – चॅप्टर १’ बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करीत आहे. १५ व्या दिवशी (दुसरा गुरुवार) ‘कांतारा – चॅप्टर १’नं ८.८५ कोटी कमावले. १६ व्या दिवशी (तिसरा शुक्रवार) : ८.५ कोटी आणि १७ व्या धनत्रयोदशीच्या दिवशी (तिसरा शनिवार) कांतारा – चॅप्टर १’नं १२.५० कोटींचा गल्ला जमवला आहे.

आज रविवार आणि उद्या सोमवार (दिवाळी) असल्यामुळे चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, २१ ऑक्टोबरपासून बॉक्स ऑफिसवर स्पर्धा वाढेल. कारण- त्या दिवशी दोन नवे सिनेमे प्रदर्शित होत आहेत. त्यात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना व आयुष्मान खुराना यांचा हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘थम्मा’ आणि हर्षवर्धन कपूर व सोनम बाजवा यांचा ‘एक दीवाने की दीवानियत’ या सिनेमांचा समावेश आहे. हे दोन्ही चित्रपट ‘कांतारा – चॅप्टर १’ला बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर देऊ शकतात.

‘कांतारा – चॅप्टर १’मध्ये ऋषभ शेट्टीसह रुक्मिणी वसंत, जयराम, गुलशन देवैया व प्रमोद शेट्टी यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट जगभरात कन्नड, हिंदी, तेलुगू, मल्याळम, तमीळ, बंगाली व इंग्रजी भाषेत प्रदर्शित झाला आहे.