बॉलिवूडमधला सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि प्रोड्यूसर करण जोहरने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केलीय. या चित्रपटाचं नाव ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ असं आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह आणि आलिया भट्ट हे दोघे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. जवळपास ५ वर्षाच्या मोठ्या ब्रेकनंतर करण जोहर या चित्रपटातून दिग्दर्शनात पुन्हा एकदा एन्ट्री करणार आहे. यापूर्वी त्याने २०१६ मध्ये रिलीज झालेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

करण जोहरने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक मोशन पोस्टर शेअर करत ही माहिती दिलीय. यासोबत त्याने एक पोस्ट देखील लिहिलीय. यात त्याने लिहिलंय, “आपल्या आवडत्या लोकांसमोर कॅमेऱ्याच्या मागे काम करण्यासाठी खूप उत्साहित झालोय…सादर करतोय रॉकी और रानी की प्रेम कहानी…. ज्याची मुख्य भूमिका दुसरं तिसरं कुणी नाही तर रणवीर सिंह आणि आलिया भट्ट करणार आहेत…कथा लिहिलीय इशिता मोइत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी… ” करण जोहरचा हा नवा चित्रपट २०२२ पर्यंत बनवून तयार होईल, असं देखील त्याने या पोस्टमध्ये लिहिलंय.

याआधी करण जोहरने सोमवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. करण जोहर गेल्या काही वर्षांपासून आपल्या धर्मा प्रोडक्शनला वाढवण्याचा प्रयत्न करतोय. पण आता पुन्हा आपल्या आवडत्या ठिकाणी फिल्म सेटवर जाण्याची इच्छा त्याने या व्हिडीओमध्ये व्यक्त केली होती. तसंच मला ते बनवायला हवं जे मला आवडतं ते म्हणजे लव्ह स्टोरीज…असं देखील या व्हिडीओमध्ये करण जोहरने म्हटलं होतं.

अनेक दिग्गज कलाकार झळकणार

करण जोहरच्या या नव्या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट व्यतिरिक्त आणखी बरेच दिग्गज कलाकार झळकणार आहेत. यात धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आजमी हे सुद्धा दिसून येणार आहेत. या चित्रपटात धर्मेंद्र आणि जया बच्चन आलियाचे आजी-आजोबा आणि शबाना आजमी या रणवीर सिंहच्या आजीच्या भूमिकेत दिसून येतील, असं बोललं जातंय. या चित्रपटाचं शूटिंग येत्या सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

करण जोहरने सगळ्यात शेवटची २०१६ साली रिलीज झालेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. पण हा चित्रपट पाकिस्तानी अभिनेता फव्वाद खानमुळे वादांच्या भोवऱ्यात सापडला होता. उरी इथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर या चित्रपटाला बायकॉट करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे हवा तितका प्रतिसाद या चित्रपटाला मिळू शकला नाही. त्यामूळे पाच वर्षानंतर पुन्हा दिग्दर्शन करणार असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटासाठी करण जोहर खूपच उत्साहित झालाय. पण हा चित्रपट प्रेक्षकांना किती आवडेल हे येणारी वेळच सांगेल.