Kareena Kapoor Birthday : बॉलीवूडची ‘बेबो’ करीना कपूर खान आज (२१ सप्टेंबर) तिचा ४५ वा वाढदिवस साजरा करीत आहे. लग्न आणि मुले झाल्यानंतरही करीनाने तिच्या करिअरशी तडजोड केलेली नाही आणि ती तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना आकर्षित करीत आहे आणि प्रेक्षकही तिच्यावर खूप प्रेम करतात. करीनाचे चाहते तिला पडद्यावर पाहण्यास नेहमीच उत्सुक असतात; पण तुम्हाला माहीत आहे का की, बेबो स्वतःचे चित्रपटही पाहत नाही? याचे कारण स्वतः बेबोनेच उघड केले होते.

करीना कपूरने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तिला स्वतःला पडद्यावर पाहणे आवडत नाही. ती तिची बहीण करिश्मा आणि आई बबिता यांना तिचे चित्रपट पाहण्यास सांगते. ती विशेषतः तिचे कोणतेही नवीन चित्रपट पाहणे टाळते. याचे कारण स्पष्ट करताना तिने सांगितले होते की, यामुळे ती घाबरते, ती चिंताग्रस्त होते, अतिविचार करू लागते. म्हणूनच ती प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी आणि त्यांच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी अनेक महिने वाट पाहण्यास प्राधान्य देते. जेव्हा ती खूप दिवसांनी तिचे चित्रपट पाहते तेव्हा तिला अधिक आराम वाटतो. ती सामान्यतः तिचे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही महिन्यांनी पाहते.

करीना कपूरने तिच्या कारकिर्दीची सुरुवात ‘रिफ्युजी’ (२०००) या चित्रपटातून केली. त्यानंतर तिने ‘कभी खुशी कभी गम’ (२००१) व ‘जब वी मेट’ (२००७) यांसारख्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान मिळवले. तिच्या सर्वांत प्रसिद्ध चित्रपटांमध्ये ‘३ इडियट्स’, ‘बजरंगी भाईजान’, ‘ओमकारा’ व ‘उडता पंजाब’ यांचा समावेश आहे.

आपल्या सुंदर लूकने आणि अनोख्या स्टाईलने करीनाने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. तिचे आयुष्य आणि प्रेमकहाणी हे नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत, विशेषतः तिने तिच्यापेक्षा १० वर्षांनी मोठ्या असलेल्या सैफ अली खानशी लग्न केल्यापासून लोक यावर चर्चा करायचे. करीनाची लव्हस्टोरी २००७ मध्ये ‘टशन’ चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली. करीना आणि सैफने या चित्रपटात एकत्र काम केले आणि त्यांची मैत्री प्रेमात बदलत गेली. करीना कपूरने २०१२ मध्ये अभिनेता सैफ अली खानशी लग्न केले. लग्नापूर्वीचे त्यांचे प्रेमसंबंधही मोठ्या प्रमाणात चर्चेत होते. लग्नानंतरही करीना चित्रपटांपासून दूर राहिली नाही, उलट तिने अनेक हिट चित्रपट दिले. या दोघांना तैमूर आणि जेह अशी मुले आहेत.