रणबीरसोबत झालेल्या ब्रेकअपबाबत कतरिना म्हणते..

ब्रेकअप होणं ही वाईटच गोष्ट असते पण अशा वेळेस स्वतःवर विश्वास ठेवणं महत्वाचं आहे.

कतरिना कैफ,रणबीर कपूर

बॉलिवूडमधली लाडकी अभिनेत्री कतरिना कैफ आणि तरुणाईचा लाडका अभिनेता रणबीर कपूर यांचं नातं हा बॉलिवूडमधील चर्चेचा विषय होता. ते जवळपास सहा वर्ष एकत्र होते. २०१६ मध्ये त्यांच्या ब्रेकअपमुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता. नुकत्याच एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत कतरिनाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि ब्रेकअपबद्दल काही गोष्टी सांगितल्या.

अनेकदा विचारूनसुद्धा या जोडीने ब्रेकअपचं खरं कारण गुलदस्त्यातच ठेवलं आहे. रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कतरिनाने स्वतःला सांभाळून कामावर कसं लक्ष केंद्रित केलं याविषयी कतरिनाला विचारलं असता, “सध्या माझ्या आयुष्यात ८० टक्वे वेळ कामासाठी आणि २० टक्वे वेळ हा वैयक्तिक गोष्टींसाठी आहे. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. सध्या माझी बरीच कामं सुरु आहेत. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.” असं ती म्हणाली.

“ब्रेकअप होणं ही वाईटच गोष्ट असते. माझ्या मते, एखाद्या व्यक्तीबरोबर असलेलं नातं तुटणं ही जगातील सगळ्यात भयंकर गोष्ट आहे. कोणालाच ते आवडत नाही. पण जर आपला देवावर आणि जगातल्या चांगल्या गोष्टींवर विश्वास असेल तर आपण त्या त्रासातून बाहेर येऊ शकतो. स्वतःवर विश्वास ठेवणं महत्वाचं आहे.” असंही ती म्हणाली.

“माझ्या वयाच्या इतर मुलींनीसुद्धा ही गोष्ट अवलंबली पाहिजे. माझे विचार ऐकून एखाद्या मुलीला तरी नक्कीच फायदा होईल” असा विश्वास तिने व्यक्त केला. ५ जून २०१९रोजी येणाऱ्या ‘भारत’ या चित्रपटात कतरिना आणि सलमान ही जोडी दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Katrina kaif on her break up with ranbir kapoor