गायन, नृत्य क्षेत्रातील सात जणींना ‘सुब्बालक्ष्मी जन्मशताब्दी पुरस्कार’ प्रदान

भारतीय शास्त्रीय संगीत आपला अमूल्य ठेवा असून त्याचे जतन आणि संवर्धन व्हावे आणि शास्त्रीय संगीताचा वारसा नव्या पिढीनेही पुढे न्यावा, असे प्रतिपादन हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी मंगळवारी मुंबईत माटुंगा येथे केले.

श्री षण्मुखानंद फाइन आर्ट्स व संगीत सभा आणि संगीत नाटक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘डॉ. एम. एस. सुब्बालक्ष्मी जन्मशताब्दी पुरस्कार’वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. किशोरी आमोणकर यांच्यासह गायन, नृत्य क्षेत्रातील सात जणींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘ठुमरीसम्राज्ञी’ गिरिजा देवी, भरतनाटय़म् नृत्यांगना व अभिनेत्री वैजयंतीमाला, कुचिपुडी नृत्यांगना यामिनी कृष्णमूर्ती, पंडवानी लोकगीत गायिका तीजन बाई, संगीत नाटक अकादमीच्या उपाध्यक्षा अरुणा साईराम, कर्नाटक संगीताच्या गायिका विशाखा हरी यांचा या वेळी गौरव करण्यात आला. श्री षण्मुखानंद फाइन आर्ट्स व संगीत संभेचे अध्यक्ष डॉ. व्ही. शंकर या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. एम. एस. सुब्बालक्ष्मी या कर्नाटक संगीताच्या अध्वर्यू होत्या, अशा शब्दात सुब्बालक्ष्मी यांचा गौरव आमोणकर यांनी केला. पुरस्कारप्राप्त अन्य गौरवमूर्तीनीही आपले विचार या वेळी मांडले. डॉ. व्ही. शंकर यांनी प्रास्ताविक केले.