लोकसत्ता प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील विद्यामान सरकारची सर्वाधिक चर्चेत राहिलेली योजना म्हणून ‘लाडकी बहीण’चा उल्लेख करता येईल. गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेत राहिलेली ही योजना आता कथारूपात मोठ्या पडद्यावरही अवतरणार आहे. ‘लाडकी बहीण’ असेच चित्रपटाचे शीर्षक असून नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला.
निर्मात्या शीतल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील व अनिल वणवे हे ओम साई सिने फिल्मच्या बॅनरखाली व शुभम फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत ‘लाडकी बहीण’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. गणेश शिंदे यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार होणार असून पटकथा-संवादलेखन शीतल शिंदे यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांसाठी उपयुक्त ठरलेल्या सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेवर आधारित या चित्रपटाचा मुहूर्त सातारा येथे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सांस्कृतिक विभाग उपाध्यक्ष पंकज चव्हाण, राजेंद्र मोहिते, अनंत काळे, महेश देशपांडे आणि तहसीलदार आदी मंडळी उपस्थित होती. ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ असंख्य महिलांनी घेतला आहे. एक महत्त्वपूर्ण विषय अतिशय खेळकर पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात येणार असून, ‘लाडकी बहीण’च्या रूपात परिपूर्ण कौटुंबिक मनोरंजक चित्रपट तयार करण्यात येत असल्याचे दिग्दर्शक गणेश शिंदे यांनी सांगितले.
या चित्रपटात मोहन जोशी, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, विजय पाटकर, अनिल नगरकर, सुरेखा कुडची, उषा नाडकर्णी, गौतमी पाटील, प्रिया बेर्डे, रुक्मिणी सुतार, भारत गणेशपुरे, जयवंत वाडकर, सारिका जाधव, जयश्री सोनवले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. गजानन शिंदे या सिनेमाचे छायालेखक असून, संगीत विनीत देशपांडे यांचे लाभले आहे. गायक अवधूत गुप्ते तसेच आनंद शिंदे यांच्या आवाजात गाणी संगीतबद्ध करण्यात येणार आहेत. पंकज चव्हाण नृत्य दिग्दर्शक असून प्रशांत कबाडे, शिवाजी सावंत हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.