कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली. आज वयाच्या ५८ व्या वर्षी राजू श्रीवास्तव यांचं निधन झाल्याची बातमी आली संपूर्ण मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली. एका रीयालिटि शोमधून पदार्पण करणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी विनोदाच्या विश्वात स्वतःचं स्थान निर्माण केलं. १० ऑगस्ट रोजी जीममध्ये व्यायाम करत असताना राजू हार्ट अटॅकमुळे अचानक खाली कोसळले आणि त्यांना थेट एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर कायम त्यांच्या तब्येतीविषयी बातम्या येत होत्या. मध्यंतरी राजू यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं होतं. अखेर आज त्यांची मृत्यूशी चाललेली दीर्घकाळ झुंज संपली.

१९८० पासून राजू मनोरंजनविश्वात कार्यरत होते, पण त्यांना खरी ओळख ही २००५ च्या ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’नंतर मिळाली. राजू यांनी ‘आप की अदालत’मध्ये रजत शर्मा यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये या प्रवासाबद्दल खुलासा केला आहे. राजू या मुलाखतीमध्ये म्हणाले, “लहानपणीपासूनच अमिताभ बच्चन हेच माझे आदर्श होते. मी जेव्हा मुंबईमध्ये आलो तेव्हा मी बेरोजगार होतो, पोट भरण्यासाठी माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. बच्चनजी यांची नक्कल करूनच मी माझ्या पहिल्या पेरफॉर्मन्सची सुरुवात केली. त्यावेळी बच्चनजी यांची नक्कल करणारे फारसे कलाकार इंडस्ट्रीत नव्हते.”

नकला आणि विनोदाचं टायमिंग यामध्ये राजू यांचा हात धरणारं तेव्हातरी कुणीच नव्हतं. आपल्या संपूर्ण करियरचं श्रेय राजू यांनी अमिताभ बच्चन यांना दिलं आहे. राजू म्हणाले, “माझ्या पोटापाण्याचा प्रश्न हा बच्चनजी यांच्यामुळेच सुटला. त्यामुळेच माझ्या आयुष्यात त्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ते तसंच राहील.”

आणखी वाचा : आत्तापर्यंत ऑस्करला पाठवलेल्या भारतीय चित्रपटांची निवड खरंच योग्य ठरली आहे का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजू यांच्या जाण्यानंतर संपूर्ण सिनेसृष्टीने हळहळ व्यक्त केली आहे. अनिल कपूर, विवेक अग्निहोत्री, अजय देवगण, सोनू सुद, राजपाल यादव यांनी सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कॉमेडी शोजबरोबरच २००९ मध्ये बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वातही राजू यांनी हजेरी लावली होती. शिवाय ‘बॉम्बे टू गोवा’, ‘मैने प्यार कीया’, ‘आमदनी अत्ठन्नी खर्चा रुपया’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत.