कास्टिंग काऊच हा शब्द ऐकला की कलाकारांचे ऐकलेले, वाचलेले अनुभव डोक्यात येतात. पण, ‘कास्टिंग काऊच विथ अमेय अ‍ॅण्ड  निपुण’ ही वेब सीरिज खळखळून हसवते.

मराठी कार्यक्रम, मालिकांमध्ये ठरावीक साचेबद्ध भाषेतील संवाद असतात. मराठी रिअ‍ॅलिटी शो, चित्रपट प्रमोशन शोजसुद्धा िहदीवरून प्रेरित असतात ही तक्रार, आरोप केला जातो. जो नक्कीच बिनबुडाचा नाही. २००४ मध्ये मराठी सिनेसृष्टीने पुन्हा एकदा ‘श्वास’ घेतला आणि नागराज मंजुळेसारखा दिग्दर्शक मराठीला लाभल्याने मराठी चित्रपटसृष्टी यापुढे ‘सराट’ करत राहील याबद्दल विश्वास वाटतो. पण इतर टीव्ही कार्यक्रम मात्र अजूनही एकसुरी असतात काळाच्या मागेच वाटतात. त्यामुळे मराठी वेब सीरिज आलीये हे कळल्यावर आश्चर्य वाटलं पण बघण्याचा उत्साह वाटला नाही. कारण वेब सीरिजसुद्धा अति गोड संवादात असणार असं वाटून गेलं. तरीही हिंमत करून हे सर्व दूषित पूर्वग्रह जवळ बाळगून मराठी वेब सीरिज बघण्यास सुरुवात केली ती म्हणजे ‘कािस्टग काऊच विद अमेय अ‍ॅण्ड निपुण’.

‘कास्टिंग काऊच’ हा शब्दच आकर्षित करतो. या शब्दांचा ऑरा प्रसन्न करणारा नाही. आजवर कास्टिंग काऊच म्हटलं की त्याबद्दल ऐकलेले, वाचलेले कलाकारांचे नकारात्मक अनुभवच आठवतात.

यापूर्वी कोयल पुरी या अभिनेत्री कम अँकरने याच नावाचा कार्यक्रम काही वर्षांपूर्वी टीव्हीवर केला होता. तर अशा पद्धतीने नकारात्मक पूर्वग्रह बाळगून कािस्टग काऊच ही वेब सीरिज बघण्यास सुरुवात केली. एकेक दूषित पूर्वग्रह गळून पडलेत किंवा शुद्ध झाले म्हणता येईल.
आजवर पाहिलेल्या मुलाखत प्रकारातला शोजपकी हा सर्वोत्तम शो, सीरिज म्हणता येईल. या सीरिजची ट्रीटमेंट अगदी खुसखुशीत आहे. अमेय वाघ तर त्याच्या प्रेमात पाडतो. इतर बऱ्याच कार्यक्रमात मागे रेकॉर्डेड लाफ्टर असतं आणि जणू प्रेक्षकांना सूचना केली जाते की इथे हसावं. हे खरं तर त्या कार्यक्रमाचं अप्रत्यक्ष अपयश असतं. आणि इथेच अमेय वाघ अणि निपुण धर्माधिकारी जिंकतात आणि कािस्टग काऊच ही ‘मराठी’ नेट सीरिज यशस्वी होते.

शरीर, चेहरे वेडेवाकडे करून किंवा जबरदस्तीने विनोद करून हसवणे हे आता कालबा होतंय. या सीरिजमध्ये असं नसून उत्स्फूर्तता, थंड पद्धतीने दोघांनी घेतलेली आणि प्रसंगी त्यांची झालेली रॅिगग हा याचा युएसपी आहे. मराठी-अमराठी कलाकारांना बोलावून त्यांच्याशी गप्पा मारणे ही या सीरिजची आखणी आहे.

या सीरिजमध्ये काऊच म्हणजे सोफ्यावर राधिका आपटे, रीमा लागू, महेश मांजरेकर, अमृता खानविलकर, श्रिया पिळगावकर, सई ताम्हणकर, प्रिया बापट असे अनेक कलाकार येऊन गेलेत. या सीरिजचा प्रत्येक भाग हा जबरदस्त आहेच पण तरीही सर्वोत्तम भाग म्हणता येईल तो नागराज मंजुळे आणि सराट टीमसोबतचा! सराट टीमला पुन्हा एकदा बघायचं असेल, कािस्टग काऊचचा त्यांचा भाग नक्की पाहावा!

रीमा लागू यांचा नेटिसोड मस्त झालाय. श्रिया पिळगावकर, राधिका आपटे, सई ताम्हणकर यांचे वेबिसोड्स आणि अमेय आणि निपुणची केमिस्ट्री अगदी झकास!

पहिला सीझन लोकप्रिय झाल्यावर नव्या हंगामात प्रसिद्ध हिंदी दिग्दर्शक आणि अभिनेता ‘गँगस ऑफ वासेपुर’चा दिग्दर्शक अनुराग कश्यपही आला होता. तो भागही अगदी खुसखुशीत झालाय.

या नेट सीरिजची खरी मजा आहे ती अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारीची केमिस्ट्री बघण्यात. सपाट चेहऱ्याने केलेले विनोद चपखल बसतात, हसवतात हे पुन्हा या सीरिजमुळे अनुभवाला येतं. अमेय वाघ हा मुलींमध्ये लोकप्रिय नट आहेच. निपुण धर्माधिकारी हासुद्धा ओळखीचा चेहरा आहे. मुळात त्याचा चेहरा हीच त्याची प्रथम ओळख असते. तो प्रथमदर्शनी गोरा विदेशी वाटतो. तो एक चांगला दिग्दर्शक आहे. आयुषमान खुराणासोबत िहदी चित्रपटातील त्याचं एक विनोदी दृश्य तरुण लोकांच्या लक्षात असेलच. मराठीत असलेला हा ‘काळा सोफा’ प्रेक्षकांना नक्कीच हसवतो आणि मराठी तरुणांनी केलेली सुरुवात नक्कीच अभिनंदनीय आहे.

तेव्हा हा काळा सोफा नक्की बघा!
तोवर चिलॅक्स!
आणि मज्जानी लाइफ करा!

response.lokprabha@expressindia.com
सौजन्य- लोकप्रभा