पाकिस्तानमध्ये २३ ते २५ एप्रिलदरम्यान रफी पीर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार होते. भारतीय चित्रपटकर्ते मधुर भांडारकर आणि नवदीप सिंग या महोत्सवाला उपस्थित राहाणार होते. परंतु सुरक्षेच्या कारणावरून पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी महोत्सवाची परवानगी नाकारल्याने मधुर आणि नवदीपची पाकिस्तान भेट रद्द झाली. दोन्ही देशांतील सांस्कृतिक देवाण-घेवाणीचा भाग म्हणून या दोघांनी साकारलेले ‘चांदनी बार’, ‘पेज ३’, ‘कॉर्पोरेट’, ‘मनोरमा सिक्स फीट’ आणि ‘NH 10’ चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येणार असल्याने मधुर आणि नवदीपचे पाकिस्तानात जाणे अपेक्षित होते. परंतु, दोन्ही देशांमधील तणावपूर्ण वातावरणामुळे हा दौरा रद्द करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मुंबई अतिरेकी हल्यातील संशयित लख्वी याची काही दिवसांपूर्वी सुटका करण्यात आल्याने पाकिस्तानामधील अधिकाऱ्यांनी सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करीत सदर कार्यक्रमाची परवानगी नाकारली. या कार्यक्रमाला भारतातील काही नामवंत व्यक्ती उपस्थित राहाणार होत्या. स्त्री व्यक्तिरेखेला केंद्रस्थानी ठेऊन चित्रपट निर्मिती केल्याबद्दल मधुर भांडारकला या चित्रपट महोत्सवात गौरविण्यात येणार होते. पाकिस्तानमधील अधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही कार्यक्रमासाठीची सर्व तयारी केली होती. व्हिसाचे कामदेखील पूर्ण झाले होते. दोन्ही देशांमधील चित्रपटांद्वारे भारत आणि पाकिस्तानदरम्यान सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी, ही या महोत्सवामागील कल्पना होती. परंतु आता महोत्सवच रद्द करण्यात आल्याचे महोत्सवाच्या आयोजकांपैकी एक शंतनु गांगुली यांनी सांगितले.