scorecardresearch

“…तर आम्ही खपवून घेणार नाही” दीपिकाच्या भगव्या बिकिनीच्या वादावर पुष्कर श्रोत्री स्पष्टच बोलला

“एक निर्माता दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून मला याची धास्ती आहे.”

“…तर आम्ही खपवून घेणार नाही” दीपिकाच्या भगव्या बिकिनीच्या वादावर पुष्कर श्रोत्री स्पष्टच बोलला
पुष्कर श्रोत्री दीपिका पदुकोण

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान ‘पठाण’ हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालं. या गाण्यात दीपिकाने परिधान केलेल्या बिकिनीवरून देशभरात राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. त्यानंतर सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे. आता या वादात मराठी अभिनेता पुष्कर श्रोत्रीने उडी घेतली आहे.

पुष्कर श्रोत्रीने आतापर्यंत अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले आहे. तो विशेषतः कॉमिक भूमिकांसाठी आणि अचूक वेळेसाठी ओळखला जातो. पुष्कर श्रोत्रीने मुंबई तकला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने दीपिका पदुकोण आणि बिकीनी वादावर भाष्य केले आहे.
आणखी वाचा- “आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर…” शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या वादावर अमिताभ बच्चन यांचं मोठं वक्तव्य

पुष्कर श्रोत्री काय म्हणाला?

“मला हा सर्व गमतीशीर खेळ वाटतोय. साधू संत आणि इतर लोकांना यावर आक्षेप नोंदवला आहे. यामागचे खरं कारणही मला समजत नाही. तसेच त्यांना नेमकं काय दाखवलं आणि त्यांनी काय बघितलंय हे देखील मला कळत नाही. आपल्याला ते गाणं आवडतंय की नाही, मला हा चित्रपट बघायचा की नाही, हा कलाकार मला आवडतो, हा कलाकार मला आवडत नाही, हे व्यक्तीसापेक्ष मत प्रत्येकाचं असू शकतं. त्यामुळे तो बघायचा की नाही हे प्रत्येकाने ठरवायंच असतं, त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर माझा पूर्ण विश्वास आहे. कारण केवळ हिंदूच नाही तर सर्वधर्मीयांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याकडे अत्यंत काटेकोरपणे लक्ष देणारी ही सरकार आहेत. हिंदूंच्या भावना दुखावल्या जाणार असतील, मग आमच्या देवी देवतांची चेष्टा असो त्यांचे वेगवेगळे चित्र काढणं असो असं कोणी केलं तर आम्ही खपवून घेणार नाही. पण त्यासाठी आक्षेप किंवा विरोध नोंदवण्यासाठी एक न्यायलयीन कोर्ट आहे, न्यायलयीन प्रक्रिया आहे, ज्याचा आपण अवलंब करु शकतो.

कोव्हिड नंतर प्रेक्षक हे चित्रपटगृहात येत नाही. एक निर्माता दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून मला याची धास्ती आहे. प्रेक्षकांची चित्रपटगृहात यावं आणि पूर्वीसारखं चित्रपटाचा आनंद घ्यावा यासाठी मी काय करायला हवं याचा विचार मी कायम करत असतो. कोणत्याही एका क्षुल्लक कारणावरुन कपड्याचा रंग हा असावा की तो असावा हा प्रश्न किती किरकोळ आहे.

त्या गाण्यात दीपिका पदुकोणने अनेक रंगाचे कपडे घातले आहेत. सोनेरी, पिवळा, निळा, सप्तरंगी असे रंग घातलेत. त्यामुळे रंगावर प्रत्येक पक्षाचा किंवा धर्माचा हक्क असू शकत नाही. मला विविध रंगांनी त्या त्या वेळी आनंद दिलेला आहे. त्यामुळे हा रंग माझा आणि तो माझा नाही, असं आपण म्हणूच शकत नाही. हे सर्व रंग आपलेच आहेत. तिने त्या इतक्या रंगाचे कपडे घातलेले असताना तुम्ही एका रंगावरुन तिने भावना दुखावल्यात असे म्हणणं चुकीचे आहे”, असे पुष्करने यावेळी म्हटले.

आणखी वाचा : “पोंक्षे, जोशी या कलाकारांनी हिंदू धर्मासाठी…” मराठी दिग्दर्शकाची टीकात्मक पोस्ट

दरम्यान ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून सुरू असलेल्या या वादावर यशराज फिल्मकडून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. ‘पठाण’ हा एक अॅक्शन थ्रीलर चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. या चित्रपटात शाहरुख खानबरोबरच दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-12-2022 at 11:51 IST

संबंधित बातम्या