अभिनेते वैभव मांगले हे मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकार म्हणून ओळखले जातात. मालिका, नाटक, चित्रपट या सगळ्या माध्यमांमध्ये वैभव मांगले यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. उत्तम अभिनयाबरोबर वैभव मांगले त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात, सध्या त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
वैभव मांगले यांनी शेअर केलेल्या फेसबुक पोस्टने सध्या सगळ्यांचे वेधून घेतले आहे. ते लिहतात, “अभिनेता हा घर बांधणाऱ्या गवंड्यासारखा असतो…. भूमिका बांधतो पण त्यात राहता येत नाही.” अर्थात ज्याप्रमाणे गवंडी फक्त घर बांधतो, पण त्या घरात वास्तव्य करणारे लोक वेगळे असतात अगदी त्याचप्रमाणे कोणताही अभिनेता कायम एकाच स्वरुपातील साचेबद्ध भूमिका आयुष्यभर करत नाही. भूमिका साकारल्यावर कधी ना कधी अभिनेत्याला त्या भूमिकेतून बाहेर पडावेच लागते, असे वैभव मांगले यांनी त्यांच्या पोस्टमधून सूचित केले आहे.
हेही वाचा : जितेंद्र जोशीची लेकीसह लंडनवारी; भावुक पोस्ट करत म्हणाला “रेवा, १३ महिन्यांची असताना…”
वैभव मांगले यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “अभिनेत्याने त्या आविर्भावात राहू पण नये की, मी अशाच भूमिका करण्यासाठी जन्म घेतला आहे… नाहीतर राजेश खन्नांसारखी परिस्थिती निर्माण होते. घर बदलत राहणे केव्हाही उत्तम.”, तर इतर काही युजर्सनी “वाह क्या बात है…” म्हणत वैभव मांगले यांचे कौतुक केले आहे.
दरम्यान, वैभव मांगले सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. यापूर्वी एका नाट्यगृहात एसी बंद पडल्यामुळे कलाकारांची कशी गैरसोय झाली होती याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत आपले स्पष्ट मत व्यक्त केले होते.