मराठी सिनेसृष्टीत अनेक ऐतिहासिक चित्रपट बनत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिजीत देशपांडे दिग्दर्शित आणि झी स्टुडिओची निर्मिती असलेला ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात मराठीतील हरहुन्नरी अभिनेता अशी ओळख असलेला सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. पावनखिंड येथे घडलेला थरार या चित्रपटातून उलगडला जाणार असल्याने या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर ते गुपित आता उलगडलं आहे.

आणखी वाचा : बिग बॉसच्या घरात होणार अपूर्वा नेमळेकरची एंट्री?, प्रोमो प्रदर्शित

गेले अनेक दिवस ‘हर हर महादेव’ हा चित्रपट चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या सुबोध भावेचा या चित्रपटातील लूक आउट झाला होता. त्यानंतर या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका कोण साकारणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. याबद्दल नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगलेली होती. तर अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. बहुआयामी अभिनेता शरद केळकर या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

शरद-केळकर

या भूमिकेबद्दल बोलताना शरद केळकर म्हणाला,“आपण लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढायांच्या, गनिमी काव्याच्या, त्यांच्या मावळ्यांच्या शौर्याच्या अनेक प्रेरणादायी कथा वाचत आलेलो आहे. बाजीप्रभुंच्या पावनखिंडीची वीरगाथा ही त्यापैकी एकच. बाजीप्रभू या व्यक्तिमत्वाबद्दल जेव्हा जेव्हा आपण वाचतो तेव्हा एकच गोष्ट जाणवते ती म्हणजे छत्रपती शिवराय आणि स्वराज्याप्रती त्यांची असलेली कमालीची निष्ठा आणि प्रेम. घोडखिंडीमध्ये त्यांनी केलेला पराक्रम हा आपल्या सर्वांसाठी कायम प्रेरणादायी असाच आहे. अशा बाजीप्रभुंची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली याबद्दल मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो.”

याआधी शरदने ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्याने साकारलेल्या या भूमिकेचे प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक झाले. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत पाहायला प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

हेही वाचा : सुबोध भावेने केली नव्या चित्रपटाची घोषणा, महेश मांजरेकर करणार दिग्दर्शन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘हर हर महादेव’ चित्रपटात अनेक नामवंत कलाकारांची मांदियाळी असणार आहे. मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेतून प्रदर्शित करण्याचा निर्णय झी स्टुडिओजने घेतलेला आहे. विशेष म्हणजे येत्या दिवाळीत पाच भारतीय भाषांमध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार आहे. येत्या २५ ऑक्टोबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.