आपल्या निखळ विनोदाने प्रेक्षकांना हसवणारे आणि आशयघन भुमिकांमधून प्रेक्षकांच्या डोळ्यांत टचकन पाणी आणणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणजे अशोक सराफ. आजवरच्या कारकिर्दीत अशोक सराफ यांनी अनेक भूमिका केल्या, ज्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अक्षरश: अधिराज्य गाजवलं आहे. अशोक सराफ यांनी १०० हून अधिक नाटक आणि २५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
अशोक सराफांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी सिनेक्षेत्रातही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. सिनेजगतामधील याच योगदानाबद्दल काही दिवसांपूर्वी भारत सरकारनं अशोक सराफांना ‘पद्मश्री’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केलं. पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. अशातच आज अशोक सराफांचा ७८वा वाढदिवस आहे.
अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यांच्याविषयी पोस्ट लिहित, काही आठवणी सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांकडूनदेखील अशोक सराफांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच अशोक सराफांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीही सोशल मीडियावर अशोक सराफांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
या पोस्टमध्ये निवेदिता असं म्हणतात, “तुला पती म्हणून लाभणं हीच माझी मोठी भाग्याची गोष्ट आहे. तुझ्या आयुष्याच्या प्रवासाचा मी एक भाग आहे, याचा मला नेहमीच अभिमान वाटतो. तू एक महान मुलगा, भाऊ, पती आणि वडील आहेस आणि त्याहूनही मोठं म्हणजे तू एक चांगला माणूस आहेस. तुझ्यावर प्रेम आहे आणि कायम राहील. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. तुझ्या आयुष्यात सहभागी होणं हीच माझी खरी श्रीमंती आहे.”
दरम्यान, अशोक सराफ यांच्या आजवरच्या प्रवासात निवेदिता यांची त्यांना पत्नी म्हणून कायमच एक सोबत राहिली आहे. याचाआ उल्लेख अशोक सराफ यांनी अनेकदा त्यांच्या मुलाखतींमधून केला आहे. अशोक सराफ यांच्या पाठीशी त्या कायमच उभ्या असल्याचे पाहायला मिळालं आहे. पद्मश्री पुरस्कारा वितरण सोहळ्यासाठी सुद्धा निवेदिता मुंबईतील त्यांची महत्त्वाची कामे सोडून दिल्लीत पोहोचल्या होत्या.