मराठी सिनेसृष्टीतील सर्वांची लाडकी आणि लोकप्रिय जोडी म्हणजे सचिन-सुप्रिया पिळगावकर. या जोडप्याचा वाढदिवसही एकाच दिवशी असतो तो म्हणजे १७ ऑगस्ट. अवघ्या चार वर्षाचे असताना चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल टाकणार्या अभिनेते सचिन पिळगावकर यांचा ६६वा तर सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांचा आज ५६वा वाढदिवस आहे. ऑन स्क्रीन केमिस्ट्रीप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही सूर जुळलेल्या या लोकप्रिय जोडीची लव्हस्टोरीही चित्रपटाप्रमाणेच आहे.
हेही वाचा- ‘बिग बॉस’ फेम मराठमोठी अभिनेत्री होणार आई; बेबी बंपचा फोटो शेअर करत म्हणाली…
१९६३ साली प्रदर्शित झालेल्या ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून सचिन पिळगावकर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. अभिनयाच्या जोरावर सचिन यांनी मराठी चित्रपटाप्रमाणे बॉलीवूडमध्येही वेगळं स्थान निर्माण केलं. ‘गीत गाता चल’, ‘बालिका बधू’, ‘अंखियों के झारोखों से’ आणि ‘नदिया के पार’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. ‘शोले’ चित्रपटाने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी १९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘माय बाप’ या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पाऊल ठेवले.
१९८४ साली प्रदर्शित झालेला ‘नवरी मिळे नवऱ्याला’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला दुसरा मराठी चित्रपट. याच चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा सचिन आणि सुप्रिया यांची भेट झाली. ‘नवरी मिळे नवऱ्याला’ चित्रपटासाठी सुप्रिया यांना कास्ट करण्यात आलं होतं. तेव्हा त्या नवख्या होत्या. ‘चमेली’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरूवात करून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. सचिन पिळगावकरांपेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या सुप्रिया त्यांच्या आईलाही भावल्या होत्या. याबद्दल त्यांनी सचिन यांच्याकडे विचार मांडला.
सचिन यांच्या मनातही सुप्रिया पिळगावकरांबद्दल भावना होत्याच. ‘नवरी मिळे नवऱ्याला’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु, आपल्या भावना एकमेकांपर्यंत पोहचवण्याचं धाडस दोघांनाही झालं नाही. शुटिंगदरम्यान सुप्रिया यांना प्रपोज करण्याचा सचिन पिळवगावकरांनी प्रयत्न केला, पण त्यांना ते जमलं नाही. अखेर चित्रपटाचं शुटिंग पूर्ण झाल्यानंतर सचिन यांनी सुप्रिया यांना आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या. परंतु, त्यावेळी सुप्रिया यांना वाटलं होतं की ते आधीच विवाहित असतील.
हेही वाचा- तुमचं वय किती? चाहत्याच्या प्रश्नावर ऐश्वर्या नारकर यांनी दिलं उत्तर, म्हणाल्या…
आपण अविवाहित आहोत हे सचिन पिळगावकरांना सुप्रिया यांना पटवून द्यावं लागलं होतं. अखेर १ डिसेंबर १९८५ मध्ये मराठी सिनेसृष्टीतील ही लोकप्रिय जोडी विवाहबंधनात अडकली. त्यानंतर दोघांनीही ‘अशी ही बनवा बनवी’, ‘माझा पती करोडपती’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आम्ही सातपूते’ यांसह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली. सचिन-सुप्रिया यांना श्रेया ही मुलगी आहे. श्रेया पिळगावकरदेखील अभिनय क्षेत्रात ठसा उमटवत आहे.