मराठी कलाविश्वात सध्या दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘सुभेदार’ चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरु आहे. शिवराज अष्टक मालिकेतील ‘सुभेदार’ हा पाचवा चित्रपट आहे. या ऐतिहासिक चित्रपटाचे कथानक ‘सुभेदार तानाजी मालुसरे’ यांच्या जीवनावर आधारित आहे. अलीकडेच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. यावेळी मीडियाशी संवाद साधताना अभिनेता चिन्मय मांडलेकरने चित्रपटासंबंधित अनेक खुलासे केले आहेत.

हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी चिन्मय मांडलेकर पाळतो ‘हे’ नियम; म्हणाला, “देशाचे पंतप्रधान आले तरी…”

शिवराज अष्टक मालिकेत आणि विशेषत: सुभेदार चित्रपटात काम करण्याच्या अनुभवाबाबत सांगताना चिन्मय मांडलेकर म्हणाला, “या संपूर्ण शिवराज अष्टक मालिकेमुळे मला खूप चांगले अनुभव आले. एक कलाकार म्हणून चांगल्या आणि दिग्गज लोकांबरोबर काम करता आले. सुभेदार चित्रपटात दिग्गज दिग्दर्शक राजदत्त यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी भूमिका केली आहे. त्यांच्याबरोबर काम करता आले हे मी स्वत:चे खूप मोठे भाग्य समजतो.”

हेही वाचा : “सुभेदारांच्या समाधीसमोर बसलो अन्…” अजय पूरकर यांनी सांगितला ‘तो’ किस्सा

चिन्मय मांडलेकर पुढे म्हणाला, “सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्यात लाडक्या ताई अर्थात अलका कुबल यांनी ‘सुभेदार’ चित्रपटात छोटी पण अत्यंत सुंदर अशी भूमिका केली आहे. त्यांच्याबरोबर माझे दोन सीन्स आहेत. मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे कारण, माहेरची साडी आम्ही चित्रपटगृहांमध्ये जाऊन अनेकवेळा पाहिला होता. त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.” दिग्दर्शक राजदत्त आणि अभिनेत्री अलका कुबल चित्रपटात कोणत्या भूमिका करणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती उघड करण्यात आलेली नाही.

हेही वाचा : “रणदीप हुड्डाने…”, महेश मांजरेकरांनी सांगितले स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बायोपिकमधून माघार घेण्याचे कारण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बहुचर्चित सुभेदार चित्रपट येत्या १८ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटामध्ये चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे, स्मिता शेवाळे या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच सुभेदार तानाजी मालुसरे यांची प्रमुख भूमिका अजय पूरकर यांनी साकारली आहे. चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे.