Deepali Pansare : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणचा बहुचर्चित आणि बहूप्रतीक्षित ‘झापुक झुपूक’ हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘बिग बॉस’ शोच्या महाअंतिम सोहळ्यात दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याच्याबरोबरच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती. तेव्हापासून अनेकजण या चित्रपटाची वाट पाहत आहेत. या चित्रपटात जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर हे कलाकार आहेत.
‘झापुक झुपूक’बद्दल दीपाली पानसरेंनी व्यक्त केल्या भावना
या कलाकारांबरोबरच ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेते मिलिंद गवळी आणि अभिनेत्री दीपाली पानसरे हेही या चित्रपटांत मुख्य भूमिकांत आहेत. दीपाली पानसरेंसाठी हा चित्रपट खास आहे आणि याबद्दल त्यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. १२ ते १५ वर्षांनी त्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने त्यांनी एक खास पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. शिवाय त्यांचा मुलगा यासाठी अधिक उत्साही असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.
“‘झापुक झुपूक’ हा चित्रपट अनेक कारणांसाठी खास आहे”
या पोस्टमध्ये दीपाली पानसरेंनी असं म्हटलं आहे की, “‘झापुक झुपूक’ तसा माझा चौथा चित्रपट ते पण तब्बल १२ ते १५ वर्षांनंतर. हा चित्रपट अनेक कारणासाठी खास आहे. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने केदार शिंदे यांच्या बरोबर काम करण्याची इच्छा पूर्ण झाली. खूप आधीपासून केदार सरांबरोबर काम करण्याची इच्छा मनात होती. पण घडून येत नव्हतं. पण अचानक एक मराठी मालिका आणि एक हिंदी मालिका एका वेळी करत असताना या चित्रपटासाठी मला फोन आला. आणि सगळं सहज जमून आलं.”
“‘झापूक झुपूक’साठी मुलगा अधिक उत्सुक आहे”
यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “सेटवर जाताना दरवेळी असते तशीच धाकधुक होती. पण सरांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे सगळं शक्य झालं. हा चित्रपट अजून खास आहे कारण माझा मुलगा रुआन झाल्यापासून मी फक्त मालिका करते आहे. त्यामुळे आता मला चित्रपटात पाहताना तो खूप खुश आहे. ‘झापूक झुपूक’च्या रिलीजसाठी तो जास्त उत्सुक आहे. अजून एक कारण म्हणजे माझे सहकलाकार मिलिंद गवळी. पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करतो आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत आमच्या एकत्र कामाचा प्रवास मध्येच थांबला होता. त्याला कारणही तसं होतं. पण आम्ही पुन्हा एकदा एकत्र काम केलं आहे.”
मिलिंद गवळींकडून दीपाली पानसरेंचं कौतुक
दरम्यान, या पोस्टखाली मिलिंद गवळींनी कमेंट करत असं म्हटलं आहे की, “दिपाली तू खूप भारी काम केलं आहेस. प्रेक्षकांना तुझं काम नक्की आवडणार. तुला खूप खूप शुभेच्छा, आणि आपला हा ‘झापुक झुपूक’ सिनेमा खूप चालणार.” शिवाय अनेक चाहत्यांनीही अभिनेत्रीला आगामी चित्रपटासाठी कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे आता सूरजचा झापुक झुपूक चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय जादू करणार, हे लवकरच कळेल.