Suhrud Godbole Post For Mrunmayee Deshpande : मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ हा सिनेमा १० ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला होता. मात्र, या सिनेमाच्या नावावर हिंदुत्ववादी संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला होता. यादरम्यान, उच्च न्यायालयाने सिनेमाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला होता. या निर्णयानंतरही पुण्यात या सिनेमाचे दोन शो बंद पाडण्यात आले, पोस्टर फाडले गेले. यानंतर संपूर्ण मराठी इंडस्ट्री मृण्मयी व ‘मनाचे श्लोक’ सिनेमाला पाठिंबा देण्यासाठी एकत्र आली.
पुण्यात सिनेमाचे शो बंद पाडले गेले त्यानंतर मृण्मयीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या सिनेमाचं नाव बदललं जाईल आणि हा चित्रपट १६ ऑक्टोबरला सर्वत्र पुन्हा प्रदर्शित केला जाईल असं जाहीर केलं होतं. यानुसार अभिनेत्रीने या सिनेमाचं नाव ‘तू बोल ना’ असं ठेवलं आहे. या सिनेमाचं नवीन पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.
‘मना’चे श्लोक सिनेमाचं नाव बदलल्यावर प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते सुहृद गोडबोले यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. “चित्रपट बनवणं हे अतिशय कठीण काम आहे. चित्रपट बनवताना रक्त, घाम, अश्रू, वेळ, पैसा आणि शेकडो लोक लागतात. जेव्हा तुम्ही तुमचा सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहत असता आणि आयुष्यात असा एक क्रूर क्षण येतो आणि तुमच्या सिनेमाचे पोस्टर फाडले जातात…हे पाहणं खरंच खूप दु:खदायक असतं. सुदैवाने आमच्या मृण्मयीकडे सिंहिणीचं काळजी आहे. काही दिवसांपासून जे मृण्मयी, संजय आणि त्यांच्या टीमला पाठिंबा देत आहेत त्यांनी सिनेमा पाहण्यासाठी नक्की जा. महत्त्वाचं म्हणजे, ज्यांनी या सिनेमाला ट्रोल केलं, अपशब्द वापरले…त्यांनी हा चित्रपट सर्वात आधी जाऊन बघा. खरंतर यात एवढं काही रागावण्यासारखं नव्हतं हं! कदाचित तुम्हाला चित्रपट आवडेल, कदाचित अजिबातच आवडणार नाही…पण सिनेमा पाहिल्याशिवाय शिव्या देणं जरा….नाही का? असो! एखादी गोष्ट निर्माण करण्यासाठी खूप मेहनत लागते आणि ती नष्ट करणं खूपच सोपं असतं. जे स्वप्न पाहतात त्यांच्यासाठी…’तू बोल ना” असं सुहृद गोडबोले यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, मृण्मयीने आणि या सिनेमातील कलाकारांनी या पोस्टवर कमेंट्स करत सुहृद गोडबोले यांचे आभार मानले आहेत. ‘मना’चे श्लोक हा सिनेमा येत्या १६ ऑक्टोबरला ‘तू बोल ना’ या नव्या नावासह प्रदर्शित होणार आहे.