Gulkand Marathi Movie Box Office Collection : प्रेम कधीही, कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतं…प्रेमाची हटके अन् मजेशीर गोष्ट सांगणारा ‘गुलकंद’ चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये सई ताम्हणकर, समीर चौघुले, प्रसाद ओक आणि ईशा डे अशी तगडी स्टारकास्ट आहे.

‘गुलकंद’ सिनेमात प्रेक्षकांना ढवळे आणि माने कुटुंबीयांची कथा पाहायला मिळतेय. हा सिनेमा १ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. गेल्या काही दिवसांपासून बॅक टू बॅक अनेक मराठी सिनेमे प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे ‘गुलकंद’ला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार, तगडी स्टारकास्ट असल्याने या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती होणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. अखेर ‘गुलकंद’ सिनेमाचं कलेक्शन समोर आलं आहे.

इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार, गुलकंद सिनेमाने पहिल्या दिवशी ५५ लाख रुपये कमावले होते. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी या सिनेमाने २५ लाखांचा गल्ला जमावला. यानंतर शनिवारी पुन्हा एकदा या सिनेमाच्या कलेक्शनमध्ये चांगली वाढ झाली. तिसऱ्या दिवशी ( शनिवार ३ मे ) या ‘गुलकंद’ने ४२ लाखांची कमाई केली. यामुळे ‘गुलकंद’चं कलेक्शन अवघ्या तीन दिवसांत वर्ल्डवाइड १.३७ कोटी इतकं झालं आहे. गेल्या काही दिवसांत प्रदर्शित झालेल्या सिनेमांच्या तुलनेत ‘गुलकंद’ने दणक्यात सुरुवात केली आहे. आता येत्या काळात या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या या सिनेमाचे बरेच शो हाऊसफुल्ल आहेत.

दरम्यान, ‘गुलकंद’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं, तर यात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे अशी तगडी स्टारकास्ट आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया हे या ‘गुलकंद’ सिनेमाचे निर्माते आहेत.

सचिन मोटे लिखित, सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात फॅमिली एंटरटेनमेंट आणि कॉमेडीचं अनोखं कॉम्बिनेशन या सिनेमात आपल्याला पाहायला मिळत आहे. या सिनेमातील कलाकारांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीस उतरली आहे.