Fussclass Dabhade Directed By Hemant Dhome : हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे!’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये प्रेक्षकांना दाभाडे कुटुंबीयांची गोष्ट पाहायला मिळणार आहे. तीन भावंडं, त्यांना कायम सांभाळून घेणारी आई, लग्नघर, भावंडांमधलं प्रेम आणि वाद या सगळ्या गोष्टी ‘फसक्लास दाभाडे!’मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

येत्या २४ जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर, या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी मिताली मयेकर पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असताना हेमंतने खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेची पोस्ट

यळकोट यळकोट जय मल्हार!
चलचित्र मंडळी या आपल्या निर्मिती संस्थेचा चौथा चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ परवापासून ( २४ जानेवारी ) तुमच्या भेटीला येतोय. म्हणजे माझं आणि क्षितीचं चौथं बाळ!

हे बाळ आमच्यासाठी जरा स्पेशल आहे. कारण हे आपल्या मातीतलं आहे… रांगडं आहे अस्सल आहे… पण खूप मायाळू आहे! याआधी आमच्या तीनही बाळांना तुम्ही खूप प्रेम दिलंत… अंगा खांद्यावर खेळवलंत! तसंच किंवा त्याहून अधिक प्रेम तुम्ही या बाळावर कराल याची खात्री आहे!

आपण संपूर्ण फॅमिलीबरोबर सिनेमा बघणं हळूहळू विसरत चाललो आहोत. त्याला अनेक कारणं आहेत, पण फसक्लास दाभाडे हा सिनेमा तुम्हाला तुमच्या सख्या-चुलत-मानलेल्या सगळ्या कुटुंबासह एकत्र बसून बघता येईल आणि तुमचं भरघोस मनोरंजन होईल असाच बनवला आहे. तेव्हा तुम्हाला तुमच्या कुटुंबाला एकत्र घेऊन जायचं आहे!

हा सिनेमा म्हणजे आमच्या कुटुंबाकडून तुमच्या कुटुंबाला मारलेली मायेची घट्ट मिठी आहे!

आता एकत्र यावंच लागतंय!

२४ जानेवारी पासून तुमच्या जवळच्या, लांबच्या कुठल्याही चित्रपटगृहात जाऊन आपल्या कुटुंबाचा हा सिनेमा नक्की बघा! आणि तुमचं आमचं नातं असं आहे की जे काही वाटलं ते हक्काने सांगा!

चांगभलं!!!

View this post on Instagram

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हेमंतच्या पोस्टवर असंख्य मराठी कलाकारांनी कमेंट्स करत ‘फसक्लास दाभाडे!’साठी दिग्दर्शकाला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. आता हा बहुप्रतीक्षित सिनेमा प्रदर्शित झाल्यावर काय सिनेमागृहात काय जादू करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.