केदार शिंदे यांचा आगामी ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता होती. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तर दिग्दर्शक केदार शिंदे यांची लेक सना शिंदे या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण करत आहे. आता लेकीला या चित्रपटातून मनोरंजन सृष्टीत पाऊल टाकण्याची संधी देण्याबद्दल केदार शिंदे यांनी भाष्य केलं आहे.

काल ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’प्रमुख मा. राज ठाकरे यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला. या टीझर लाँच सोहळ्यानंतर केदार शिंदे यांनी त्यांच्या चित्रपटाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. त्यांची लेक सना शिंदे हिला केदार शिंदे यांनी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्याची संधी दिली आहे. त्यांनी त्या भूमिकेसाठी तिची निवड कशी आणि का केली हे त्यांनी ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत शेअर केलं.

आणखी वाचा : Video: ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर यांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्वांची झलक समोर

ते म्हणाले, “या चित्रपटातून सनाने मनोरंजन सृष्टीत पदार्पण करावं असं मला या चित्रपटाचं लिखाण संपत आल्यावर जाणवलं. पण त्याआधी तिला कधीही कोणीही विचारलं तर तिचं उत्तर असायचं की मला हिरोईन व्हायचं आहे. माझी स्वतःची अशी इच्छा होती की तिने अभिनेत्री व्हावं; कारण हिरोइन होणाऱ्या खूप आहेत. अभिनेत्री होण्यासाठी कस लागतो आणि हा चित्रपट असा होता की ज्यातून सना अभिनेत्री म्हणून समोर येईल आणि लोकांना तिचं काम दिसेल. या चित्रपटात खरोखरच तिचा कस लागला आहे. तिच्या पहिल्याच चित्रपटात मी तिच्यावर किती मोठी जबाबदारी दिली आहे असं मला हा चित्रपट बघताना वाटतं.”

पुढे ते म्हणाले, “त्याआधीची चार वर्ष तिने अत्यंत प्रामाणिकपणे आणि मन लावून माझ्या हाताखाली काम केलं आहे. त्यादरम्यान तिने माझा अनेकदा ओरडही खाल्ला, या चित्रपटात काम करतानाही तिला मी ओरडलो आहे. कारण सर्वांना माहीत आहे की मी कशाप्रकारे काम करून घेतो. ही माझी मुलगी आहे म्हणून तिला वेगळी वागणूक नसते. ते नातं दिग्दर्शक आणि कलाकाराचं असतं. मला लोकांसमोर ही गोष्ट मांडायची आहे त्यामुळे मला तितकंच कठोरपणे काम करून घेणं गरजेचं आहे. वडील म्हणून घरी मुलीचे लाड करणं वेगळं. पण घर सोडून जेव्हा कामाला येतो तेव्हा मी तिचा वडील नसतो तर मी तिचा दिग्दर्शक असतो.”

हेही वाचा : Photos: दाराबाहेर पत्रपेटी, जुना लाकडी दरवाजा…’असं’ आहे शाहीर साबळे यांचं मुंबईतील घर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटात अंकुश चौधरी, सना शिंदे यांच्याबरोबरच अभिनेत्री अश्विनी महांगडे हीदेखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यात लता मंगेशकरांची भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय-अतुल यांनी सांभाळली आहे. २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.