मराठीमध्ये सध्या अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. अशातच आता अजून एक चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला ‘जारण’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने चित्रपटातील कलाकार मंडळींनी नुकतीच ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली.

‘जारण’ चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष, अनिता दाते यांच्यासह अभिनेते किशोर कदमही झळकणार आहेत. हा चित्रपट करणी, काळी जादू, भूतबाधा या विषयांवर भाष्य करीत असल्याचं ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. किशोर कदम यांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये घडलेल्या एका प्रसंगाबद्दल सांगितलं आहे. त्यांना जारण वगैरे प्रकार तुम्ही अनुभवले आहेत का कधी, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “आमच्या सोसायटीमध्ये आजही असे प्रकार होतात. गच्चीच्या कोपऱ्यात कोणीतरी कुंकू वगैरे टाकलेलं असतं. काही न काही लोक करतच असतात. आम्हाला ते २-३ लोक कोण आहेत हे माहीत आहे; पण मला कळत नाही की, ते हे कधी करतात आणि एवढा वेळ त्यांना कसा मिळतो?”

“एकदा तर मी नवीन गाडी खरेदी केली होती तेव्हा मी शूटिंगला जाण्यासाठी सकाळी खाली गाडीजवळ आलो आणि बघतो तर गाडीवर काळे तीळ पसरवलेले होते. मला माहीत होतं की, ज्यानं केलं आहे तो वरून बघत असेल तेव्हा मी ते गाडीवरचे सर्व तीळ गोळा केले आणि खाल्ले. मग गाडीत बसून शूटिंगसाठी निघालो. कारण- माझा या सगळ्यावर विश्वासच नाहीये. आजही मुंबईसारख्या शहरात हे प्रकार घडत आहेत याचं आश्चर्य वाटतं. जेव्हा मी माझ्या बायकोला याबद्दल सांगितलं तेव्हा ती म्हणाली की, तू काहीही करत असतोस. आता काही झालं तर मला सांगू नको.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, किशोर कदम यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी आजवर, ‘घर बंदूक बिर्यानी’, ‘बस्तार’, ‘पाणी’, ‘हर हर महादेव’, ‘झुंड’, ‘सेक्शन ३७५’, ‘फँड्री’, ‘नटरंग’, ‘जोगवा’, यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता लवकरच ते ‘जारण’ या चित्रपटात झळकणार आहेत. शुक्रवारी (६ जून) रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.