मराठी सिनेसृष्टीतील धडाकेबाज सुपरस्टार अशी ख्याती असणारे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांचा जीवनप्रवास पुस्तकरूपात रसिकांच्या भेटीला आला आहे. महेश कोठारे यांच्या यशा-अपयशाची गाथा ‘डॅम ईट आणि बरंच काही’ या पुस्तकातून सांगितली गेली आहे. गेली अनेक दशकं ते त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत आले आहेत. या त्यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांना मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांची साथ लाभली. यातलं एक नाव म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे.
लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यांची जोडी प्रचंड लोकप्रिय झाली. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट केले. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. आता ‘डॅम ईट आणि बरंच काही’ या पुस्तकत महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अनेक आठवणी वाचायला मिळणार आहेत. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी महेश कोठारेंना लक्ष्मीकांत बेर्डे यांची खूप आठवण आली.
आणखी वाचा : “त्या काळी आमच्यात स्पर्धा होती पण…,” सचिन पिळगांवकरांनी उलगडलं महेश कोठारेंबरोबरचं नातं
‘न्यूज18 लोकमत’शी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल बोलताना महेश कोठारे म्हणाले, “लक्ष्मीकांत बेर्डे आणि माझी ओळख, आमची मैत्री, त्याच्याबरोबरच्या काही आठवणी असं बरंच काही मी या पुस्तकात लिहिलेलं आहे. तो माझा इतका जवळचा मित्र आहे आणि लक्ष्या आजही माझ्याबरोबर असल्याचं मला वाटतं.”
हेही वाचा : “अरे याला आधी कोणीतरी जेवायला द्या…”, अभिनेता संदीप पाठकने सांगितला लक्ष्मीकांत बेर्डेंचा ‘तो’ किस्सा
‘डॅम इट आणि बरंच काही’च्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त करताना महेश कोठारे म्हणाले, “माझ्या आयुष्यातील हा खूप मोठा दिवस आहे. या पुस्तकाद्वारे मी माझं संपूर्ण जीवन सर्वांसमोर आणलं आहे. यात माझ्या जीवनातील चढ-उतार आणि संघर्ष आहे. हे पुस्तक म्हणजे संपूर्ण जर्नी आहे. कुठल्याही तरुण-तरुणींना कोणत्याही क्षेत्रांत जर यश मिळवायचं असेल, तर त्याला या पुस्तकातून नक्कीच एक प्रेरणा मिळेल.”