scorecardresearch

“अरे याला आधी कोणीतरी जेवायला द्या…”, अभिनेता संदीप पाठकने सांगितला लक्ष्मीकांत बेर्डेंचा ‘तो’ किस्सा

“एका कलाकाराच्या गैरहजेरीमुळे मला त्या नाटकात काम करण्याची संधी मिळाली.”

अभिनेता संदीप पाठक हा नेहमी काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. संदीपने आतापर्यंत अनेक विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे सिनेसृष्टीत त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून स्वतःची एक वेगळी छाप उमटवणारा अभिनेता म्हणून त्याला ओळखले जाते. पण सिनेसृष्टीत एक उत्कृष्ट अभिनेता होण्यासाठी त्याला अथक मेहनत घ्यावी लागली. नुकतंच त्याने एका मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल आठवणीचा किस्सा सांगितला आहे.

“बीड जिल्ह्यातील माजलगाव हे संदीप पाठकचे मूळ गाव आहे. त्यानंतर तो शिक्षणाच्या निमित्ताने औरंगाबादला गेला. पण त्याला अभिनयाची ओढ शांत बसू देत नव्हती. त्यानंतर त्याने पुण्याच्या ललित कला केंद्रमधून नाट्यशास्त्राची पदवी मिळवली. यानंतर तो पुढे करिअरच्या निमित्ताने मुंबईत आला. पण मुंबई त्याचे कोणीही मित्र किंवा नातेवाईक नव्हते. त्यामुळे जे काही करायचं ते स्वतःच्या बळावर करायचं हे त्याचवेळी कळून चुकले होते. एका आजोबांकडे पेइंग गेस्ट म्हणून राहण्याची सोय झाली. पण तिथे संध्याकाळी ७ ते सकाळी ९ वाजेपर्यंतच राहायला मिळायचे. सकाळी बरोबर नऊच्या ठोक्याला ते आजोबा खोलीला कुलूप लावायचे. त्यामुळे माझ्याकडे काहीतरी काम शोधण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नव्हता.”

Video : “खूप झालं, मला तुला डान्स शिकवायचा नाही…”; आगरी-कोळी कॉमेडी किंग विनायक माळीवर अमृता खानविलकर संतापली

“माझ्या नाटकाची आवड मला एकदा लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याकडे घेऊन गेली. ‘सर आले धावून’ या नाटकाची तालीम सुरु होती, त्यात लक्ष्मीकांत बेर्डे महत्वाच्या भूमिकेत होते. त्या नाटकाची तालीम बघायला मिळणे हीच त्यावेळी महत्त्वाची संधी होती. त्यावेळी मी फार बारीक होतो आणि वडिलांचे निधन झाल्याने माझ्या डोक्यावरचे केस कापले होते. ती तालिम सुरु असताना अचानक लक्ष्मीकांत बेर्डे यांचे माझ्याकडे लक्ष गेले आणि माझ्या शरीराकडे पाहून ते पटकन म्हणाले, ‘अरे याला आधी कोणीतरी जेवायला द्या.’ यानंतर एका कलाकाराच्या गैरहजेरीमुळे मला त्या नाटकात काम करण्याची संधी मिळाली”, असा किस्सा त्याने सांगितला.

“मुंबई शहराचा स्वभाव या ठिकाणी असलेल्या समुद्रासारखा आहे, आधी तो बाहेरुन आलेल्यांना बाहेर फेकतो, पण त्यानंतर तुमची जिद्द आणि चिकाटी पाहून तो त्यात तुम्हाला सामावून घेतो”, असेही त्याने म्हटले.

“…आता मराठी चित्रपट १०० कोटींच्या घरात जायला वेळ लागणार नाही”, चिन्मय मांडेलकरचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

संदीप पाठकने आतापर्यंत श्वास, एक डाव धोबीपछाड, हरिश्चंद्राची फॅक्टरी, शहाणपण देगा देवा, एक हजाराची नोट, येड्याची जत्रा, देऊळ बंद, डबल सीट, नटसम्राट, बेनवाड, ईडक, राख अशा अनेक चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. वऱ्हाड निघालंय लंडनला या नाटकाने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. दरम्यान लवकरच तो श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांची मुख्य भूमिका असलेल्या आपडी थापडी या चित्रपटात झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actor sandeep pathak share interesting story about late actor laxmikant berde during drama nrp

ताज्या बातम्या