Priyadarshan Jadhav on Limelight: दर्जेदार अभिनय, लक्षवेधी भूमिका, गाजलेले चित्रपट, खासगी आयुष्यातील सार्वजनिक झालेल्या गोष्टी यांमुळे कलाकार प्रसिद्धीझोतात असतात. त्यांच्या व्यावसायिक आयुष्याची जितकी चर्चा होते, तितकीच चर्चा त्यांच्या खासगी आयुष्याचीही होते.

आता लोकप्रिय मराठी अभिनेता प्रियदर्शन जाधवने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रसिद्धीझोतात असण्याबद्दल वक्तव्य केले आहे. प्रसिद्धीझोतामध्ये राहण्याची इच्छा चुकीची नसल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे.

“अर्थाचा अनर्थ होईल…”

‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शनला विचारण्यात आले की, जेव्हा सतत तुम्ही लाइमलाइटमध्ये असता, तेव्हा त्याची तुम्हाला भीती वाटायला लागते का? त्यावर प्रियदर्शन म्हणाला, “तुम्ही काही चुकीचं केलं नाही, तर भीती वाटण्याचं काही कारण नाही. लाइमलाइट उत्तम पद्धतीने स्वीकारता आलं पाहिजे. ते नीट टिकवता आलं पाहिजे.”

“अर्थाचा अनर्थ होईल की काय, ट्रोल होऊ की काय ही भीती लाइमलाइटमध्ये आल्यानंतर असते. त्याबरोबरच सध्या आपल्याकडे ही प्रसिद्धी आहे, पण, ती पुढे कायम राहील याची शाश्वती नाहीये. त्यामुळे हे आपल्या हातातून निघून जाईल की काय, अशी एक भीती असते; पण ट्रॅपमध्ये अडकू नये, या मताचा मी आहे. आता जर लाइमलाइटमध्ये आहात, तर त्याचा आनंद घ्या आणि उद्या जर तुम्ही लाइमलाइटमध्ये नसाल. दुसरं कोणीतरी असेल, तर ते तुम्हाला छान पद्धतीनं स्वीकारता आलं पाहिजे.”

“कोणाला तरी लाइमलाइटकडे पळायचं असतं आणि कोणाला तरी कलेत प्रावीण्य मिळवायचं असतं. त्यामध्ये उत्तम काम करायचं असतं. तर कोणाला कुठे जायचं आहे, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. पण, लाइमलाइट ही खूप मस्त गोष्ट आहे आणि मी तिचा खूप आनंद घेतो. सगळ्यांना लाइमलाइटमध्ये राहायला आवडतं आणि फार कमी लोकांना ते मिळतं. तुम्ही जर स्मार्ट असाल, तर लाइमलाइट टिकवता येईल. या क्षेत्रात राहण्यासाठी ते थोडंफार करावं लागतं.”

“माझा एक मित्र आहे. मी त्याचं नाव घेणार नाही. तो लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी वाटेल ते करतो. वाटेल ते म्हणजे ऊठसूट काहीतरी घाणेरडं करतो, असं नाही. लाइमलाइटमध्ये टिकून राहण्यासाठी विविध दृष्टिकोनातून स्वत:च्या करिअरकडे बघतो. तो त्याचा पुरेपूर वापर करून घेतो. मला त्यात काही चुकीचं वाटत नाही. भासवलं असं जातं की, हा किती स्वत:चा मोठेपणा सांगतोय. स्वत:चं किती कौतुक सांगत आहे, असं त्याच्याकडे पाहिलं जातं. त्यावर लोक बोलतात. पण मला वाटतं की, तो प्रोफेशनचा भाग आहे.”

प्रियदर्शन पुढे असेही म्हणाला की, यशाबरोबर अनेक गोष्टी येतात. आव्हानं, अडचणी, जबाबदारी यांसह काही नकारात्मक गोष्टीही यशाबरोबर येतात. तर ती बॅग घेऊन तुम्हाला चालावं लागतं. ती बॅग सुटली की, यश सुटतं. तुम्हाला तुमच्या खांद्यावर ते घ्यावंचं लागणार, त्याला पर्याय नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रियदर्शन नुकताच ‘ऑल इज वेल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.