Dashavatar : ‘दशावतार’ चित्रपट चार दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे. फक्त मराठी नाही तर इतर भाषिक प्रेक्षकही दशावतार पाहून या सिनेमाचं कौतुक करताना दिसत आहेत. चित्रपटाची कमाईही कोटींमध्ये होत आहे, पण तरीही निर्मात्यांनी या सिनेमाबद्दल एक निर्णय घेतला. त्या निर्णयावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सुबोध खानोकर दिग्दर्शित ‘दशावतार’ चित्रपटात मराठीतील दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करतानाचे अनेक फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत. चार दिवसांत ६ कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या या चित्रपटाच्या तिकिटाचे दर निर्मात्यांनी कमी केले आहेत.
‘दशावतार’च्या निर्मात्यांनी आज एक ऑफर ठेवली आहे. त्यानुसार, दशावतार चित्रपट प्रेक्षकांना फक्त ९९ रुपयांमध्ये पाहता येणार आहे. ही ऑफर आज मंगळवार (१६ सप्टेंबर) साठी आहे. झी स्टुडिओजच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून या संदर्भात पोस्ट करण्यात आली आहे. पण ही ऑफर ठेवण्याची काहीच गरज नसल्याचं मत प्रेक्षकांनी व्यक्त केलं आहे.
पाहा पोस्ट-
प्रेक्षकांच्या कमेंट्स
इन्स्टाग्रामवर दशावतारच्या तिकिटाचे दर कमी केल्याच्या पोस्टवर प्रेक्षकांनी कमेंट्स केल्या आहेत. ‘अरे का तिकीट कमी करताय.. मुव्ही छान आहे,’ ‘तिकिटाचे दर आहे तेवढेच ठेवा, कमी का करताय.’ ‘आताच मुव्ही पाहून आलो. सोमवार असूनही खूप प्रेक्षक होते, चालतंय तसं चालू द्या,’ ‘ऑफर ठेवली ही चांगली गोष्ट आहे, पण दर कमी करण्याची काहीच गरज नव्हती, खूप दिवसांनी मराठीमध्ये तगडा चित्रपट आलाय.. नक्की पाहा’, अशा कमेंट्स या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, ‘दशावतार’ने चार दिवसांत ६.२३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाला जगभरात उत्तम प्रतिसाद मिळतोय. त्याच पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी आज एका दिवसासाठी सिनेमाच्या तिकिटाचे दर कमी केले आहेत. आज मंगळवारी प्रेक्षकांना हा चित्रपट फक्त ९९ रुपयांमध्ये पाहता येईल. कोकणातील पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट तुम्हीही पाहिला नसेल, तर आज पाहू शकता.
‘दशावतार’ या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज आहे. तसेच विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.