Mrinal Kulkarni : मराठी कलाविश्वाच्या ‘सोनपरी’ म्हणून अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना ओळखलं जातं. मराठी मालिका, चित्रपट, नाटक अशा विविध माध्यमांतून त्यांनी गेली अनेक वर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या मृणाल यांनी वैयक्तिक आयुष्यात १० जून १९९० रोजी रुचिर कुलकर्णी यांच्याशी लग्नगाठ बांधली.
आज मृणाल कुलकर्णींच्या लग्नाचा ३५ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने सोशल मीडियावर पतीसाठी खास पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मृणाल-रुचिर यांच्या लग्नाला आज ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने अभिनेत्रीने खास अंदाजात पतीला शुभेच्छा दिल्या आहेत.
१९९० मध्ये मृणाल व रुचिर कुलकर्णी यांनी प्रेमविवाह केला. वयाच्या १९ व्या वर्षी अभिनेत्रीने लग्नगाठ बांधली होती. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मृणाल यांना त्यांच्या घरच्यांचा खूप मोठा पाठिंबा मिळाला. लग्न झाल्यानंतर खऱ्या अर्थाने अभिनय क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहायला लागले असं त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलेलं आहे.
आपल्या पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अभिनेत्री लिहितात, “मी खरंच खूप भाग्यवान आहे… कारण, मला माहिती आहे की आयुष्याच्या या प्रवासात तू कायम माझ्याबरोबर आहेस. यापुढेही असेच एकत्र राहूयात” या पोस्टसह मृणाल कुलकर्णींनी त्यांच्या लग्नातील सुंदर फोटो देखील शेअर केला आहे.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव करत या जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, सध्या मृणाल व रुचिर कुलकर्णी यांचा मुलगा विराजसने त्याच्या अभिनयासह दिग्दर्शनातील कामगिरीने रसिक प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. यंदाच्या वर्षात त्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. याशिवाय विराजची पत्नी व मृणाल कुलकर्णींची सून शिवानी रांगोळे सुद्धा छोट्या पडद्यावरची आघाडीची नायिका म्हणून ओळखली जाते. या तिघांनी ‘सुभेदार’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं.