Mrunmayee Lagoo : मराठीसह हिंदी कलाविश्व गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच रीमा लागू. २०१७ मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला. तर, त्यांचे पूर्व पती ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं १९ जूनला निधन झालं. रिमा व विवेक लागू यांच्या मुलीचं नाव मृण्मयी लागू असं आहे. मृण्मयी सुद्धा दिग्दर्शक व लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
आजच्या घडीला मृण्मयी यशस्वी लेखिका देखील आहे. तापसी पन्नूची प्रमुख भूमिका असलेल्या ‘थप्पड’ सिनेमाच्या लेखकांच्या टीमचा मृण्मयी एक भाग होती. तसेच ‘स्कूप’ सारख्या गाजलेल्या प्रोजेक्टची लेखिका म्हणून देखील मृण्मयीने ओळख मिळवली आहे. मृण्मयीने आज तिच्या आई-बाबांच्या आठवणीत पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
“एकत्र काम करताना ते दोघंही सर्वात जास्त आनंदी असायचे. तेव्हाच हसायचे, चेष्टा करायचे, भांडायचे, एकमेकांशी गप्पा मारायचे. या आयुष्यात असा अनुभव घेण्याचा बहुमान सगळ्यांना मिळत नाही… आज तिचा वाढदिवस आहे…ती आम्हाला ८ वर्षांपूर्वी सोडून गेली आणि शेवटी तो म्हणाला, “आता पुरे झालं, मला जायचंय” आणि मग तो १९ तारखेला निघून गेला. मला आशा आहे की, तुम्ही दोघंही आज एकत्र असाल. मला तुमची खूप आठवण येते पण, त्यापेक्षाही मी तुम्हा दोघांना एकत्र पाहणं जास्त मिस करते. शेवटी आता तुम्ही एकत्र आहात हेच माझ्यासाठी समाधानकारक आहे.”
दरम्यान, मृण्मयीने शेअर केलेल्या पोस्टवर मराठी कलाकारांसह चाहत्यांनी कमेंट्स करत दु:ख व्यक्त केलं आहे. विवेक लागू यांच्याबद्दल सांगायचं झालं, तर त्यांच्या ‘व्हॉट अबाऊट सावरकर’, ‘अग्ली’, ‘३१ दिवस’, ‘गोदावरीने काय केले’ या कलाकृती प्रचंड गाजल्या होत्या. मराठी नाटक व सिनेमांबरोबरच ‘चार दिवस सासूचे’, ‘हे मन बावरे’ या गाजलेल्या मालिकांमध्येही विवेक लागू यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या निधनानंतर मराठी सिनेविश्वातील कलाकार, त्यांचे चाहते दु:ख व्यक्त करत आहेत.