मालिका असो वा चित्रपट, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही नेहमीच तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते. ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरच काही’, ‘बाई गं’, असे चित्रपट ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतील तिची भूमिका सर्वांच्याच लक्षात आहे. आता अभिनेत्री एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबरोबरच अभिनेत्रीला नुकत्याच एका मुलाखतीत तिला तिच्या महिन्याच्या खर्चाबद्दल विचारले. त्यावर तिने काय उत्तर दिले हे जाणून घेऊयात.

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने नुकतीच ‘सुमन म्युझिक मराठी’च्या ‘आम्ही असं ऐकलंय’ या शोमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर वक्तव्य केले. तिची १५ मुले म्हणजे नक्की कोण, याचादेखील तिने खुलासा केला. याबरोबरच व्यावसायिक व अनेक खासगी गोष्टींबाबत तिने वक्तव्य केले. याच मुलाखतीत अभिनेत्रीला तिचा महिन्याचा खर्च विचारण्यात आला. यावर बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “खूप आहे, कितीही पैसे कमावले तरी कमीच पडतात, खूप खर्च आहे”, असे उत्तर दिले.

याबरोबरच या मुलाखतीत प्रार्थनाला विचारले की, आनंदी संसारासाठी तुझ्याकडे काय मंत्र आहे, यावर बोलताना अभिनेत्रीने म्हटले, “एकमेकांना जगू द्या. आम्ही एकमेकांवर बंधनं घातली नाहीत. भांडणं तर होणारच, पण मला असं वाटतं की ती भांडणं त्याच दिवशी संपवण्याचा प्रयत्न करा. मी तर असंच करते. आज जर भांडण झालं तर ते दुसऱ्या दिवशी उकरून काढायचं नाही. तो विषय संपला, तिथेच संपवायचं”, असे म्हणत तिने जर भांडण झालं तर त्याच दिवशी भांडण संपवायचं, असे म्हटले.

प्रार्थनाने तिच्या आयुष्यातील तत्व सांगताना म्हटले, “तुम्ही तुमच्या आयुष्यातील कर्म चोख करा. हे सगळं कर्म करण्याविषयी आहे, त्यामुळे तुमच्या आयुष्यात असलेली कर्म चोख करा. तुम्हाला त्याचं फळ मिळेल. तुम्ही जे करण्यासाठी जन्म घेतला आहे, ते व्यवस्थित करा. बाकी सगळ्या गोष्टी आपोआप होतात.”

दरम्यान, अभिनेत्रीने याच मुलाखतीत फिट राहण्यासाठी आनंदी राहण्याचा सल्ला दिला. आता ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटातील तिची भूमिका नेमकी काय असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रार्थना बेहेरेसह या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी, वनिता खरात, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, प्राजक्ता माळी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.