देशातील पहिलं सहकारी विद्यापीठ असलेल्या ‘त्रिभुवन सहकार विद्यापीठा’चं विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर झालं आहे. राज्यसभेत सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विधेयक मांडून चर्चेस उत्तर दिलं. त्रिभुवन सहकार विद्यापीठ सहकार क्षेत्राला बळकटी देण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देईल, असं प्रतिपादन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्यसभेत केलं.

केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ४० मिनिटांच्या भाषणाची सध्या सर्वत्र चर्चा होत असून, त्यांचं कौतुक करण्यात येत आहे. त्यांचे जवळचे मित्र व मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे प्रवीण तरडे यांनी देखील पोस्ट शेअर करत आपल्या मित्राचं भरभरून कौतुक केलं आहे. या पोस्टसह तरडेंनी मुरलीधर मोहोळ यांच्या भाषणाची संसद टीव्हीवरील लिंक देखील शेअर केली आहे.

प्रवीण तरडे यांची पोस्ट

माझा लाडका दोस्त आज देशाचा लाडका झाला. देशाच्या सर्वोच्च सभागृहात आज तो बोलत होता तेव्हा त्याचा अख्खा प्रवास आठवला…
मुळशीच्या मुठा गावातील जिल्हा परिषदेची शाळा… शाळा सुटल्यावर स्वतःच्याच ऊसाच्या गुऱ्हाळात वडिलांना मदत…त्यानंतर मोठ्या कष्टाने कोल्हापूरमध्ये कुस्ती प्रशिक्षण शिवाय कुस्ती शिकता-शिकता कला शाखेची पदवी… त्यानंतर भाजपासारख्या एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षात राजकीय पार्श्वभूमी नसताना एक कार्यकर्ता म्हणून प्रवेश आणि मग तीस वर्षांच्या एका कार्यकर्त्याचा प्रामाणिक संघर्ष आज दिल्लीत सोन्यासारखा चमकला.. पुणेकरांचा लाडका मुरलीधर बोलत होता आणि अख्खा देश त्याला ऐकत होता… या भाषणानंतर मोठमोठ्या दिग्गजांनी त्याची पाठ थोपटली…मित्रा खूप मोठा झाला आहेस असाच होत राहशील.. कारण ही फक्त सुरुवात आहे…

प्रवीण तरडे यांच्या पोस्टवर प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांनी, “प्रचंड अभिमान आहे” असं कमेंट करत म्हटलं आहे. “मुरली अण्णांचा खरोखर अभिमान वाटतो. अण्णा मराठी माणसांसाठी एक प्रेरणास्थान आहेत.” अशा प्रतिक्रिया प्रवीण तरडेंच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भाजपाचे वॉर्ड अध्यक्ष म्हणून मुरलीधर मोहोळ यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. २०१९ ते २०२२ या काळात ते पुण्याचे महापौर होते. गेल्यावर्षी पहिल्यांदाच ते खासदार झाले आणि मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली.