माधुरी दीक्षित व श्रीराम नेने यांची निर्मिती असलेल्या ‘पंचक’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या ‘पंचक’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपटाने यशस्वीरित्या दुसऱ्या आठवड्यात पदार्पण केलं आहे. नुकतंच या चित्रपटाचं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कौतुक केलं. अशा लोकप्रिय चित्रपटात अभिनेत्री तेजश्री प्रधान झळकली आहे. या चित्रपटातील तिच्या कामाचं कौतुक होतं आहे. अशातच तिने यश म्हणजे नेमकं काय असतं? ती यशाकडे कशाप्रकारे बघते? याविषयी सांगितलं.

अभिनेत्री तेजश्री प्रधानने ‘पंचक’ या चित्रपटाच्यानिमित्ताने नुकतीच ‘मिरची मराठी’ या रेडिओ चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी ती यश या विषयी बोलली. तसंच तिने एक मोलाचा सल्ला देखील दिला.

हेही वाचा – तेजश्री प्रधान टेलीव्हिजनकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहते आणि ते तिच्यासाठी किती महत्त्वाचं आहे? जाणून घ्या…

‘मिरची मराठी’च्या मुलाखतीमध्ये तेजश्रीला विचारण्यात आलं होतं की, ती यशाकडे कशी बघते? यावर अभिनेत्री म्हणाली, “मी यशाकडे असं बघते की कालच्या माझ्या व्हर्जनपेक्षा आजचं माझं व्हर्जन चांगलं आहे का? मी जो आज दिवस घालवला आहे, तो घालवल्यानंतर रात्री मला समाधानाची झोप लागतं असेल तर मी त्या दिवशी यशस्वी झाले. याच्या पलीकडे यश काही नसतं. हे मृगजळ आहे. मी टेलीव्हिजन आज एवढी वर्ष करतेय. टेलीव्हिजनचे माझे साडेतीन, चार हजार भाग करून झाले असतील. पण तरीही ज्या दिवशी माझा शो संपतो त्याच्या दुसऱ्या दिवशी आजही मला लोक विसरतात. आणि माझा नवीन शो सुरू झाल्यानंतर पुन्हा मला ते नव्याने डोक्यावर घेतात. त्यामुळे हे मृगजळ आहे.”

हेही वाचा – “हा महिना माझ्यासाठी…”, अभिनेत्री तेजश्री प्रधानने सांगितली आईच्या निधनानंतरची परिस्थिती; म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुम्ही दिसताय तोपर्यंत तुम्ही आहात. ज्या दिवशी तुम्ही दिसायचे बंद होणार आहात ना त्यादिवशी काही नसणार आहे. त्यामुळे तुमच्या प्रवासावर लक्ष द्या. कारण तो प्रवास हा तुमचा असतो. तो इतरांचा प्रवास नसतो. तुम्ही कुठल्याही लांबच्या प्रवासाला निघाल्यानंतर जसं की, गोव्याला निघाल्यावर दोन्ही बाजूला झाडं दिसतात ते दृश्य बघायला छान वाटतं. पण ते दृश्य बघून व्हायच्या आत मागे निघूनही जातं. तुमच्याबरोबर काहीच राहत नाही. तो एक प्रवास आहे. जो चालूच आहे आणि चालूच राहणार आहे. त्यामुळे याकाळात लोक येतील तुमचं कौतुक करतील, ट्रोल करतील पण ते कायम नसतं. त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या प्रवासावर लक्ष द्या,” असं तेजश्री प्रधान म्हणाली.