Pushkar Jog Unfollowed his Pakistan’s Friends: काश्मीर येथील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ ला दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांना जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर अनेक पाकिस्तीनी कलाकारांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.
पहलगाम येथील हल्ल्यानंतर अनेक कलाकारांनी संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. पाकिस्तानला उत्तर दिले पाहिजे, असेही अनेकांनी म्हटले होते. अनेकांनी ज्यांनी या हल्ल्यात जीव गमावला त्यांच्याप्रति भावना व्यक्त केल्या होत्या. आता अभिनेता पुष्कर जोगने एका मुलाखतीत यावर वक्तव्य केले आहे.
पहलगाम हल्ल्यावर पुष्कर जोग म्हणाला…
पुष्कर जोगने एका मुलाखतीत ‘लोकशाही फ्रेंडली’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने म्हटले, “मला असं वाटतं की खूप झालं. पाकिस्तान या देशाचं आपण खूप सहन केलं. खूप ऐकलं. आपलं जे आता सरकार आहे, ते प्रबळ, हुशार आणि दणकट आहे. त्यामुळे आता पाकिस्तानला उत्तर देण्याची गरज आहे. कारण-खूप वर्षांपासून आपण ऐकतोय, २६/११ चा हल्ला किंवा पुलवामामध्ये झालेला हल्ला, दरवर्षी किंवा वर्षाआड ते चालूच असतं. आता बास झालं.”
“ज्यांना पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आहे. जे म्हणतात की हे सगळं वेगळं आहे. हे राजकारण आणि मनोरंजन क्षेत्र एकत्र करू नका. मनोरंजन क्षेत्र वेगळं आहे. का एकत्र करायला नको? इथे येऊन पाकिस्तानमधील गायक, कलाकार हे बॉलीवूडमधून कमावतात. पैसे तिकडे घेऊन जातात. प्रत्येकाला हे माहित आहे की पाकिस्तान हा देश दहशतवादाला पाठिंबा देणारा, प्रोत्साहन देणारा देश आहे. हे उघड आहे. त्यामुळे, त्यांच्या देशातले कलाकार इथे येऊन कसं चालेल? जे शहीद झाले, हा त्यांचा अपमान आहे.”
पुढे पुष्कर जोग म्हणाला, “मला असं वाटतं की आता त्यांना उत्तर द्यायला हवं. आता बास झालं. मी सोशल मीडियावर बघतो की पाकिस्तानी लोकांच्या अंगात मस्ती आहे, ती काढायला हवी. ते लोक आगाऊ आहेत. सोशल मीडियावर पाकिस्तानचे काही नागरिक माझ्या ओळखीचे लोक आहेत. जे युकेमध्ये आहेत, ते माझे मित्र आहेत. मी त्यांना अनफॉलो केलं. कारण-मला या गोष्टी पटत नाहीत.”
“ते माझे मित्र आहेत. पण, माझ्यासाठी माझा देश आधी येतो. जे शहीद झालेले जवान आहेत, ते माझ्यासाठी महत्वाचे आहेत. मी भारताला प्राधान्य देतो. एवढं सगळं होऊन पाकिस्तानचे सैन्य अधिकारी वेगळंच काही बोलत आहेत. भारताला निर्विवाद पाठिंबा देण्याऐवजी त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही बचाव करण्यासाठी तयार आहोत. जर त्यांचा या हल्ल्यात काही हात नाहीये, मनात काही खोट नाहीये. तर ज्यांनी पर्यटकांना मारलं आहे, त्यांना शोधण्यासाठी भारताला मदत करायला हवी. त्यामुळे पाकिस्तानचे लोक निर्लज्ज आणि आगाऊ आहेत. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल राग आहे”, असे म्हणत पुष्कर जोगने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.