Chanchal Song : सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित ‘गुलकंद’ चित्रपटांची सध्या चर्चा सुरू आहे. हा चित्रपट १ मेला प्रदर्शित होणार आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि वेलक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित ‘गुलकंद’ चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, प्रसाद ओक, ईशा डे हे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. नुकतंच ‘गुलकंद’ चित्रपटातील पहिलं-वहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. ज्याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. ‘गुलकंद’ चित्रपटातील पहिल्या गाण्याचं नाव ‘चंचल’ असं आहे.

‘गुलकंद’ चित्रपटातील ‘चंचल’ या सुरेल गाण्यानं रसिकांच्या मनाला हळूवार स्पर्श केला आहे. गाण्यात दाखवण्यात आलेली प्रेमाची सुंदर आणि गोड दृश्यं प्रेक्षकांच्या मनात घर करणारी असून या भावपूर्ण गाण्यांना मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केलं आहे. तर अविनाश – विश्वजीत यांनी संगीतबद्ध केलं आहे. ओठांवर सहज रुळणारं हे गाणं लोकप्रिय गायिका आनंदी जोशी आणि रोहित राऊत यांनी गायलं आहे.

दोन्ही जोडप्यांच्या नात्यांमधील केमिस्ट्री आणि हलक्या-फुलक्या क्षणांची गुंफण मनाला भिडणारी असून प्रेमाचे हे सुरेख क्षण या गाण्यातून सुंदरपणे टिपण्यात आले आहेत. ‘गुलकंद’ चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक व्यतिरिक्त वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे यांसारखे तगडे कलाकार मंडळी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिग्दर्शक आणि निर्माते सचिन गोस्वामी म्हणाले, “‘गुलकंद’ हा चित्रपट म्हणजे प्रेमाच्या गोड आठवणींचा साखरपाकच. प्रेम हा फक्त मोठ्या भावनांचा विषय नसून, ते लहानसहान क्षणांमध्ये, हलक्या-फुलक्या हळवेपणात लपलेलं असतं. हेच या गाण्यातून आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आहे. ‘गुलकंद’ हा चित्रपट प्रेमाच्या विविध छटांचा वेध घेणारा असून प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला हे गाणं आवडेल.” निर्माते संजय छाब्रिया म्हणाले, “‘गुलकंद’ हा प्रेमाचा गोडवा चाखवणारा चित्रपट आहे. प्रेमातील निरागसता आणि त्यातील हलकं-फुलकं हास्य हे आम्ही या गाण्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी तुमच्या आमच्या घरातील गोष्ट असल्याचा भास या गाण्यातून होतं आहे.”