ग्रुपिझम (गटबाजी) हा बॉलीवूडसह मराठी मनोरंजन सृष्टीतला कायमच चर्चेचा मुद्दा राहिला आहे. याबद्दल अनेक कलाकारांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही दिवसांपुर्वी अभिनेत्री सविता मालपेकरांनी प्रसिद्ध दिग्दर्शकांवर गटबाजी केल्याबद्दल काही विधानं केली होती. तसंच महेश मांजरेकरांनीही एका मुलाखतीत गटबाजीबद्दल उघडपणे त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. अशातच आता एका मराठी अभिनेत्याने या गटबाजीबद्दल त्याचं मत व्यक्त केलं आहे.
अभिनेता संजय खापरेने मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दल एका मुलाखतीत त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. गोळाबेरीज या युट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गटबाजीबद्दल मत व्यक्त करताना त्याने असं म्हटलं, “तुमचं कलाकारांबरोबर एक प्रकारचं नातं तयार झालेलं असतं. आपण ज्याला ग्रुपिझम म्हणतो, ते म्हणजे त्या त्या कलाकारांचा एक कम्फर्ट झोन असतो. मला काय अभिप्रेत आहे, ते समोरच्याकडून पटकन मिळतं.”
पुढे त्याने असं म्हटलं, “काही दिग्दर्शक मंडळी अशी असतात की, मी या कलाकाराला डोळयांसमोर ठेवून भूमिका लिहिली. त्याला काय काय येतं, ते मी माझ्या लिखाणातून आणतो. अशी आपल्या कम्फर्ट झोनमध्ये काम करणारी कलाकार मंडळी असतात. एखाद्याचं पात्र करायचं असेल, तर मला त्या पात्राप्रमाणेच गेलं पाहिजे असं माझं मत आहे आणि हे प्रत्येकाचं असेल असं नाही.”
यापुढे संजय म्हणतो, “जगामध्ये इतकी माणसं आहेत, त्या प्रत्येकात भिन्नता आहे. स्वभाव वेगवेगळे आहेत. तसंच व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. प्रत्येकाची मानसिकता वेगळी आहे. आपण कोणाला सांगू शकत नाही की, असं वाग किंवा वागू नकोस. तुम्ही कोणाची मनं वळवू शकत नाही. मी काम करत असताना मला वेगवेगळ्या लोकांबरोबर काम करायला आवडतं आणि कम्फर्ट झोनच्या पलीकडे जाऊन काम करायला आवडतं.”
दरम्यान, संजय खापरेच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ‘गाढवाचं लग्न’, ‘दे धक्का २’, ‘लय भारी’, ‘दगडी चाळ’ यांसारख्या चित्रपटांमधून सहाय्यक अभिनेता आणि खलनायकाची भूमिका साकारली आहे. तर ‘यदा कदाचित’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘तू तू मी मी’, ‘श्यामची मम्मी’ या नाटकामधूनही तो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. कलर्स मराठीवरील ‘लय आवडतेस तू मला’ मालिकेतही त्याने काम केलं होतं.