Shreyas Talpade & Prarthana Behere New Project : श्रेयस तळपदे मराठी व हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने हिंदीसह मराठीतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत वेगवेगळ्या माध्यमांतून काम करीत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अशातच आता दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अभिनेत्यानं त्याच्या नवीन प्रॉजेक्टची घोषणा केली आहे.
श्रेयस तळपदेनं आज दसऱ्याचं औचित्य साधून त्याच्या नव्या प्रॉजेक्टची घोषणा केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यामधून त्याच्याबरोबर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेही झळकणार आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेनंतर दोघे पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
श्रेयस तळपदे व प्रार्थना बेहेरे झळकणार नवीन चित्रपटातून
श्रेयसनं नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. यावेळी त्यानं या पोस्टमधून “आईच्या आशीर्वादानं दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नांदी होत आहे. एका नव्या निर्मितीची… असू देत लाख महिषासुर… पुरे आहे फक्त एक…’मर्दिनी’. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आम्हा सर्वांवर अखंड राहू द्या! भेटूया .. २०२६ मध्ये!” असं म्हटलं आहे.
श्रेयसनं यावेळी चित्रपटाचं मोशन पोस्टर शेअर केलं असून, तोच या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचं पाहायला मिळतं. यावेळी प्रार्थना बेहेरेनं व दिग्दर्शक अजय मयेकर यांनीही ही पोस्ट त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे. त्यामुळे आता ‘माझी तुझी रेशीमगाठ’नंतर श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहेरे आणि या मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर हे त्रिकूट पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक नवीन कलाकृती घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत.
श्रेयसनं शेअर केलेल्या या पोस्टखाली दिग्दर्शक केदार शिंदे, अमृता खानविलकर, अभिजीत खांडकेकर यांसारख्या अनेकांनी कमेंट्स करीत त्यांना चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. श्रेयसनं पोस्टमधून म्हटल्यानुसार २०२६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यासह प्रार्थना व श्रेयस यांच्याबरोबर अजून कोणते कलाकार या चित्रपटातून झळकणार याचा अद्याप खुलासा झालेला नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजय मयेकर, श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहेरे हे तिघे एकत्र स्पॉट झाले होते. त्यावेळी श्रेयसच्या हातामध्ये स्क्रिप्ट असल्याचं पाहायला मिळालेलं. तेव्हापासून प्रार्थना व श्रेयस पुन्हा एकत्र झळकणार का याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली. अशातच आता अखेर त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा झाली आहे.